Sunday, February 9, 2025
HomeमानिनीParenting Tips : मुलांचे संगोपन करा या मॉडर्न पेरेंटिंग टिप्सनी

Parenting Tips : मुलांचे संगोपन करा या मॉडर्न पेरेंटिंग टिप्सनी

Subscribe

मुलाच्या जन्मापासून ते मोठे होईपर्यंत किंवा त्यानंतरही त्याच्या प्रत्येक सवयीसाठी समाजाकडून पालकांना जबाबदार ठरवले जाते. जर मूल एक चांगली व्यक्ती बनली तर आई-वडिलांना अर्थातच त्याचा सगळ्यात जास्त अभिमान वाटतो, पण मुलाने खोड्या किंवा गुन्हा केला तर आई-वडिलांना लोकांकडून जास्तीत जास्त टोमणे खावे लागतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांचं योग्य संगोपन करत नाही. तुमच्या संगोपनात नक्कीच काही उणिवा नसतील, पण बदलत्या काळानुसार, जुन्या काळात मुलांचे संगोपन करण्यासाठी ज्या पद्धती अवलंबल्या जात होत्या, त्या आजही उपयोगी ठरतीलच असं काही नाही. अशा परिस्थितीत, आज आपण जाणून घेऊयात मुलांच्या संगोपनासाठी काही मॉडर्न पेरेंटिंग टिप्स.

वेळ देणे आहे महत्वाचे :

आजच्या व्यस्त जीवनात मुलांना वेळ देणे खूप गरजेचे आहे. मानसिक तणावात असणाऱ्या या पिढीची सर्वात मोठी तक्रार ही असते की आईवडील मुलांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींवर त्यांची कानउघाडणी करतात पण आरामात बसून त्यांची मन:स्थिती समजून घेण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. अशा परिस्थितीत, पालकांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज मुलांसाठी थोडा वेळ काढला पाहिजे.

एकत्र निर्णय :

मुलाने एखादी चूक केली तर पालकांपैकी एक जण त्याला खडसावतो, तर दुसरा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, असे अनेकदा दिसून येते. खरंतर ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. पालक या नात्याने तुम्ही दोघांनीही मुलाशी संबंधित निर्णयांवर एकत्र असले पाहिजे, जेणेकरून त्याला असे वाटू नये की जो टोमणे मारतो तो त्याच्यावर प्रेम करत नाही.

Parenting Tips: Raise your children with these modern parenting tips

त्यांच्यासाठी आदर्श बना :

असं म्हटलं जातं की मुलांच्या संगोपनात पालकांचं योगदान सर्वात मोठं असतं. अशा स्थितीत ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना नकार देत आहात ती गोष्ट तुमच्याकडूनच चुकूनही पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात. आपल्यापेक्षा मोठी माणसं कशी वागतात, काय करतात याकडे त्यांचं बरोबर लक्ष असतं. म्हणूनच मुलांसाठी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते तुमच्याकडे बघून तुमच्यासारखंच वागू लागतील. तुमच्याकडून चांगल्या सवयी शिकतील.

लाड करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या :

आधुनिक पिढीला हाताळण्यासाठी पालकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की लाड करण्याबरोबरच कधीकधी कठोर बनणे आणि भीती घालणे देखील आवश्यक आहे. अनेकदा असे दिसून येते की दोन्हीपैकी एकही गोष्ट कमी-जास्त असेल तर मुले हट्टी आणि खोडकर बनतात. अशा वेळी लाड आणि कठोरता यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून देण्याचा प्रयत्न करा.

केवळ आईच जबाबदार नसते :

जुन्या काळात असे मानले जात होते की मुलाने जी मूल्ये आत्मसात केली आहेत ती आईमुळेच असतात आणि त्यांच्या संगोपनाची खरी जबाबदारीही आईच्या खांद्यावर असते. मात्र आज तशी परिस्थिती नाही. मॉडर्न पेरेंटिंगनुसार असे म्हटले जाते की जेव्हा मुलाच्या जन्मात आई आणि वडील दोघेही योगदान देतात, तेव्हा त्याला एक चांगला माणूस बनवण्याची जबाबदारी एकट्या आईची नसते. म्हणून, पालकांनी परस्पर सल्लामसलत करून मुलाशी संबंधित सर्व निर्णय आणि त्यांची कामं वाटून घ्यायला हवीत.

हेही वाचा : Fashion Tips : हे कॉन्ट्रास्ट सलवार सूट करा ट्राय


Edited By – Tanvi Gundaye

Manini