आजच्या काळात स्वत:ला सि्दध करण्याचे मोठे आवाहन तरुण पिढीसमोर आहे. कारण सगळ्याच क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण आहे. यात जो पुढे जातो तो हुशार असा त्यावर शिक्का मारला जातो. त्यातही आपले मूल इतरांपेक्षा किती हुशार, स्मार्ट आहे हे जगजाहीर करण्याचा पालकांचा अट्टहास धोकादायक आहे. कारण मूल जेव्हा यशस्वी होतं तेव्हा त्यावर सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढतोच पण काहीवेळा त्याच्यातील अहंभावही वाढतो. पण जर तेच मूल जेव्हा एखादया दुसऱ्या स्पर्धेत मागे पडते तेव्हा मात्र त्यावर झालेली टीका मुलांना सहन करता येत नाही. अशी मुलं आत्मविश्वास गमावतात. नैराश्येत जातात. कारण आपण अयशस्वीही होऊ शकतो , मागे पडू शकतो हे पालकांनी त्यांना शिकवलेलंच नसतं. यामुळे टीका मुलांना सहन करता येत नाही. म्हणूनच मुलांना कौतुकाबरोबरच टिकादेखील सहन करण्याचे धडे पालकांनी देणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. कारण त्यामुळे मुलाला कोणतीही परिस्थिती हाताळणं शक्य होतं. अन्यथा अशी मुलं एकटी पडण्याचा धोका वाढतो. एवढंच नाही तर टिकेला संधी म्हणून घेतल्यास त्याचे बरेच सकारात्मक परिणाम आयुष्यावर होऊ शकतात.
कारण तज्ज्ञांच्यामते टीकेची सकारात्मक बाजू पाहिल्यास मुलांचा मानसिक विकास, आत्मविश्वास आणि भावनिक आकलन वाढण्यास मदत होते. हे केवळ त्यांचा दृष्टिकोनच बदलत नाही तर जीवनात मुलांना अधिक कणखर आणि हुशार बनवते.
अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना जर टीकेला न घाबरता किंवा निराश न होता ती शिकण्याची संधी आहे असे शिकवले तर मुले टीकेला घाबरणार नाहीत. आत्मविश्वासाने स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतील.
त्यासाठी पालकांनी मुलांना टीकेचा अर्थ फक्त दोष शोधणे नाही, तर त्याचा उद्देश त्यांना उणिवा निदर्शनास आणून देणेही असतो असे सांगावे. ज्यामुळे त्या उणीव दूर करण्यास मदतच मिळते. यामुळे टीका झाल्यास वाईट वाटून न घेता. स्वत: ला सुधारावे. असे सांगावे.
तसेच टीकेला न घाबरता, निराश न होता सामोरे जाण्याचा सल्लाही पालकांनी मुलांना द्यायला हवा. तसेच प्रत्येकजण चुका करतो, परंतु त्यातून जो शिकतो तोच पुढे जातो. म्हणून, जेव्हा कोणी टीका करते तेव्हा मुलांनी शांत राहण्याची आणि लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावली पाहिजे. असे मुलांना सांगावे.
हेही वाचा : Parenting Tips : विभिन्न विचारांचे पालकही बनू शकतात गुड पॅरेंट
Edited By – Tanvi Gundaye