मोबाईल-इंटरनेट आणि बदलत्या जीवनशैलीत मुलांचे चांगले आणि योग्य संगोपन करणे आता कठीण बनले आहे.
मुले तुमची वागणूक, तुमच्या सवयी शिकतात आणि इतरांसोबतही तसेच वागतात. त्यामुळे, घाई-गडबड आणि व्यस्त वेळापत्रक असूनही, मुलांसमोर काही लहानसहान गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत. कारण ही त्यांच्या आयुष्यभराची सवय होईल, जी त्यांच्या भविष्यासाठी चांगली नसेल. म्हणूनच, जर तुम्हाला चांगले पालक बनायचे असेल आणि मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करायचे असेल तर काही सवयी बदलणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात या सवयींविषयी.
छोट्या-छोट्या गोष्टींवर टोमणे मारणे टाळा :
बऱ्याच वेळा लहान मुलांवर ओरडणे किंवा त्यांना लहानसहान गोष्टींसाठी शिव्या देणे ही सवय अनेक पालकांना असते. एखादी गोष्ट शिकवताना किंवा समजावून सांगताना मुलाला काही समजत नसेल, तर त्याला ओरडण्याऐवजी त्याला प्रेमाने समजावून सांगा कारण मुलांवर सतत ओरडल्याने मुलांना प्रश्न विचारण्याची भीती वाटेल आणि तुम्ही त्याच्यावर ओरडल्याने त्याला राग येईल.
स्वतःचे निर्णय स्वत: घेण्याची संधी द्या :
मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, यामुळे त्यांची विचारसरणी आणि समज विकसित होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही मुलांना काम करण्याचे स्वातंत्र्य द्याल तेव्हा त्यांची सर्जनशीलता सुधारेल. ते त्यांच्या समस्या तुमच्याशी शेअर करतील आणि तुमच्यामधील बाँडिंगही चांगले राहिल.
दोष देणे टाळा :
कधी कधी असंही होतं की पालकांना मुलांच्या काही सवयी आवडत नाहीत. अशा स्थितीत त्याला चांगले-वाईट बोलू नका. त्याला कशासाठीही दोष देऊ नका. चांगले पालकत्व म्हणजे तुम्ही कितीही रागावलात किंवा नाराज असलात तरी मुलांसमोर तुमचा राग जाहीर न करता त्यांना समजावणीच्या भाषेत त्यांची चूक समजावून सांगा.
कधीही तुलना करू नका :
प्रत्येक मुलाचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे तुमच्या मुलाची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका.
असं असू शकतं की तुमचं मूल एखादं काम चांगलं करत नसेल पण इतर कामं करत असताना तो इतरांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह आणि सर्वोत्तम असू शकतो. म्हणून, त्याला त्याच्या या वैशिष्ट्याची जाणीव करून द्या आणि त्याला प्रोत्साहित करा.
प्रत्येक वेळी इच्छा पूर्ण करणे आवश्यक नाही :
काहीवेळा मुलांच्या इच्छा त्यांच्या ताबडतोब पूर्ण करणे देखील धोकादायक ठरू शकते. अनेक पालक असे असतात की मुलांनी काहीही मागण्यापूर्वीच ते त्यांच्यासाठी ती वस्तू आणून देतात. अशा परिस्थितीत ही सवय मुलांवर नकारात्मक परिणाम करू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखादी वस्तू आणता तेव्हा याचा विचार करा की ती वस्तू मुलासाठी खरंच गरजोपयोगी आहे की नाही.
गॅझेट्सची सूट देणे टाळा :
सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मुलं आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन आणि गॅजेट्समध्ये घालवू लागली आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या डोळ्यांवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्या विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांना गॅजेट्स वापरण्याची कमी परवानगी द्या आणि त्यांना मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.
संयम सर्वात जास्त आवश्यक आहे :
पालकांनी आपल्या मुलांना संयम आणि शांत राहण्यास शिकवले पाहिजे. सध्या लोकांमध्ये हे कमी पाहायला मिळते. हे गुण मुलामध्ये सुरुवातीपासूनच रुजवले तर तो भविष्यात यशस्वी होऊ शकतो आणि या सवयी त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासही मदत करतील.
कसे जिंकायचे ते शिकवा पण अपयशाला कसे सामोरे जायचे हे देखील शिकवा :
हे स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे मुलांमध्ये जिंकण्याची सवय झपाट्याने वाढत आहे. म्हणून, मुलाला जिंकण्यासाठी प्रोत्साहित करणे ही वाईट गोष्ट नाही तर त्याला अपयशाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यास देखील शिकवा. अनेक वेळा हरल्यानंतरही मुलांना खूप काही शिकायला मिळते.
हट्टाला प्रेम समजू नका:
अनेक वेळा मुलं हट्ट करतात तेव्हा आई-वडील मुलांना जे करायचं ते करू देतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मुलांना प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्या हट्टाला कधीच प्रेम समजू नये. चांगल्या पालकत्वासाठी भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याद्वारे मुले योग्य आणि अयोग्य यातील फरक जाणून घेऊ शकतात.
स्वतःला बदला :
चांगल्या पालकत्वासाठी पालकांनी स्वतः अनेक सवयी सोडल्या पाहिजेत. यातूनच मुलांना उत्तम भविष्य मिळू शकते. आपल्या मुलांना दोष देण्याऐवजी, आपल्या लहान सहान वाईट सवयी सोडून देणे आणि त्यांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Wedding-Planner- लग्नाच्या या सिझनमध्येच बना ‘वेडींग प्लानर’ कमवा लाखो रुपये
Edited By – Tanvi Gundaye