मुलांच्या उज्ज्वल आणि चांगल्या भविष्यासाठी लहानपणापासूनच त्यांचे योग्य संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यावर संस्कार करणे गरजेचे आहे. परंतु, हल्लीच्या काळात मुलांचे संगोपन करणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक झाले आहे. विशेषत: जेव्हा मुलं मोठी होऊ लागतात आणि त्यांच्या किशोरवयीन काळात खोटं बोलू लागतात तेव्हा ते पालकांसाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. अशावेळी मुलांशी नेमकं कसं डील करावं हे पालकांना समजत नाही.
अनेकदा मुलं जेव्हा बोलायला शिकतात तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक बदलही घडत असतात. जेव्हा ते बोबडे बोल बोलू लागतात तेव्हा तो आईवडिलांसाठी खूप प्रेमळ अनुभव असतो. पण चांगल्या गोष्टींबरोबरच ते काही वाईट गोष्टीही शिकतात, जसे की चुकीचे शब्द शिकणे, उलट उत्तरं देणे , खोटे बोलणे इ.
या काळात रागावण्याऐवजी त्यांना प्रेमाने हाताळले पाहिजे, जेणेकरून त्यांची जडणघडण नीट होईल आणि चांगले चारित्र्य निर्माण होईल. म्हणूनच, जर तुमचे मूलही खोटे बोलू लागले तर अशा परिस्थितीत मुलांना समजावण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.
शांत रहा :
खोटे बोलणे ही चूक आहे, तो गुन्हा नाही किंवा खोटं बोलणं हे नेहमीच वाईट असतं असाही काही भाग नाही. मुलाच्या इतर कोणत्याही चुकीवर जशी प्रतिक्रिया देता तशीच त्यांच्या या चुकीवरही प्रतिक्रिया द्या. त्यांना दुरुस्त करा, चूक समजावून सांगा पण कठोर किंवा चुकीचे शब्द वापरू नका. मुलावर ओरडणे किंवा त्यांना मारणे यामुळे मुलं भीतीमुळे काही काळ खोटे बोलणे थांबवतात, परंतु ही त्यांची कायमची सवय होत नाही. मुलांना ओरडल्याने मुलं खोटे बोलणे थांबवणार नाहीत , उलट मुलं आपलं खोटं लपवण्यासाठी आणखी दहा खोटं बोलू लागतील.
सत्य सांगण्यास प्रेरित करा :
मुलाला स्पष्ट शब्दात सांगा की खोटे बोलणे ही चांगली गोष्ट नाही, प्रामाणिकपणा त्याहूनही महत्त्वाचा आहे. मुलाला सांगा की तो कधीही खोटे बोलत असला तरीही, ते प्रामाणिकपणे कबूल केल्याने त्याला त्याचे फार वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत. त्याच्या मनात अपराधीपणा भरण्याऐवजी त्याच्यात सत्य सांगण्याची प्रेरणा निर्माण करा.
पाया मजबूत करा :
मुलाचा मानसिक विकास होत असताना त्याची सामाजिक कौशल्ये देखील विकसित होत असतात. त्यामुळे, ते कोणत्याही सामाजिक परिस्थितीला हाताळण्यासाठी खोट्याचा अवलंब करायला शिकतात. या विकसनशील अवस्थेत, त्यांच्या सवयींचा पाया भक्कमपणे बांधला जाऊ शकतो. लहान मुलांचं मन हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं त्याला जसा आकार देऊ तसं ते वळतं. त्यामुळे मुलांच्या किशोरवयीन अवस्थेत त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना शांततेने समजावून सांगणे हाच योग्य मार्ग आहे.
हेही वाचा : Indoor Plants : सकारात्मक उर्जेसाठी घरात लावू शकता ही झाडे
Edited By – Tanvi Gundaye