तुम्हाला ठाऊक आहे का की घरात असणारा एक लहानसा , प्रेमळ पाळीव प्राणी केवळ घरात आनंदच आणत नाही तर याच्यामुळे आपलं आरोग्यही सुधारण्यास मदत होते. तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे? परंतु हे खरं आहे. एक पाळीव प्राणी तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊयात हे कसं शक्य आहे याबद्दल.
मानसिक आरोग्यात सुधारणा :
तणाव कमी होतो :
पाळीव प्राण्यांसोबत खेळणे हा तणाव कमी करण्याचा एक चांगला उपाय आहे. जेव्हा तुम्ही पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवता तेव्हा तुमच्या शरीरातील ऑक्सिटॉसीन नावाचे हार्मोन रिलीज होते. जे तुम्हाला शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी मदत करते.
एकटेपणा कमी करते :
जर तुम्ही एकटे राहत असाल तर पाळीव प्राणी तुमच्यासाठी एक चांगला साथीदार बनू शकतात. पाळीव प्राणी सोबत असल्याने तुम्हाला कधीच एकटे वाटणार नाही.
डिप्रेशन किंवा एंझायटी कमी होते :
पाळीव प्राणी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यांना पाळल्यामुळे डिप्रेशन किंवा एंझायटीसारख्या लक्षणांमध्ये सुधारणा होते. पाळीव प्राण्यांचे प्रेम मानसिक आरोग्याशी लढण्यासाठी मदत करते.
शारीरिक आरोग्यात सुधारणा :
व्यायाम करण्यासाठी मोटिव्हेट करतात :
पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जाण्यासाठी आणि त्यांच्यासोबत खेळण्यासाठी तुम्हाला नियमितपणे घराबाहेर पडावे लागते. ज्यामुळे तुमची शारीरिक हालचाल वाढते. हे वजन कमी करण्यासाठी आणि आजारांचा धोका कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
रक्तदाब कमी करते :
पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने रक्तदाब कमी होतो. ज्यामुळे हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते :
पाळीव प्राण्यांसोबत खेळल्याने तुमचे शारीरिक स्वास्थ्य सुधारते आणि इम्युनिटी मजबूत होते.
सामाजिक आयुष्यात सुधार :
नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळते :
जेव्हा तुम्ही पाळीव प्राण्यांना घेऊन एखाद्या पार्कमध्ये जाता तेव्हा तुम्हाला नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. हे तुमचे सामाजिक आयुष्य सुधारण्यात मदत करते.
मुलांच्या विकासासाठी मदत करते :
पाळीव प्राणी हे लहान मुलांच्या विकासासाठी फायदेशीर असतात. पाळीव प्राण्यासोबत खेळल्याने मुलांमध्ये जबाबदारी, करुणा आणि सहानुभूती असे गुण वाढीस लागतात.
सुरक्षेची भावना वाढते :
पाळीव प्राणी घराच्या सुरक्षेसाठीही आवश्यक असतात. ते अनोळखी व्यक्तींना घरापासून दूर ठेवतात.आणि तुम्हाला सुरक्षिततेची भावना देतात.
प्राणी पाळण्याआधी या गोष्टींकडे द्या लक्ष :
प्राण्यांची देखभाल :
प्राणी पाळणे ही एक जबाबदारी आहे. तुम्हाला नियमितपणे त्याच्या खाण्यापिण्याची आणि व्यायामाची काळजी घ्यावी लागते.
प्राण्याचा प्रकार :
कोणताही प्राणी पाळण्यापूर्वी तो कोणत्या जातीचा आहे हे पहायला हवे आणि त्यानुसार त्याच्या जीवनशैलीकडे लक्ष द्यायला हवे.
अॅलर्जी :
जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना प्राण्याच्या केसांची अॅलर्जी असेल तर प्राणी पाळणे धोकादायक ठरू शकते. त्याची काळजी घ्या.
हेही वाचा : Best time for dinner : रात्री लवकर का जेवावे?
Edited By – Tanvi Gundaye