पिस्ता हे एक लोकप्रिय ड्रायफ्रूट आहे, जे खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. चविष्ट असणारा हा पिस्ता अनेक नवनव्या पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र काही लोक सहसा पिस्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांची साले फेकून देतात. जर तुम्हीही असेच करत असाल तर असे करणे थांबवायला हवे कारण पिस्त्याचे कवच अनेक आश्चर्यकारक आणि उपयुक्त कारणांसाठी देखील वापरले जाऊ शकते. ही साले केवळ पर्यावरणपूरक नाहीत तर तुमचे घर आणि बाग सुशोभित करण्यासाठी देखील यांचा वापर होऊ शकतो. या साली कशा वापरता येतील ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.
बागकामात उपयोग :
या साली जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. पिस्त्याच्या कवचांचा वापर झाडांभोवती आच्छादन म्हणून करता येतो. या साली मातीला कोरडे होण्यापासून रोखतात आणि गवतामध्ये अतिरिक्त वाढणारे तणही नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
कंपोस्टिंगसाठी उपयुक्त :
बागेच्या कचऱ्यात या साली मिसळल्यास त्यापासून कंपोस्ट तयार करता येऊ शकते. ज्यामुळे मातीची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढू शकते.
पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी :
कुंड्यांच्या तळाशी पिस्त्याच्या साली ठेवल्या तर यामुळे जास्तीचे पाणी काढून टाकण्यास मदत होते आणि झाडाची मुळे कुजण्यापासून वाचतात.
घर सजावट आणि हस्तकला :
क्रिएटिव्ह क्राफ्टिंग –
पिस्त्याच्या कवचांचा वापर सुंदर आर्टवर्क आणि हस्तकला वस्तू तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. पिस्त्याच्या साली रंगवून भिंतीची सजावट, फुलांचे किंवा मेणबत्तीचे स्टँड बनवता येऊ शकतात.
टेबल सजावट –
पिस्त्याच्या कवचापासून बनवलेले छोटे सजावटीचे तुकडे तुमच्या जेवणाच्या टेबलाचे आकर्षण वाढवू शकतात.
मुलांसाठी पर्यावरणपूरक प्रकल्प
मुलांच्या हस्तकला प्रकल्पांसाठी हे एक उत्तम साहित्य आहे. यामुळे त्यांची सर्जनशीलता तर वाढेलच आणि त्यांना पुनर्वापराचे महत्त्वही समजेल.
सजावट आणि उत्सवांमध्ये वापर
दिवाळी किंवा ख्रिसमसकरता सुंदर सजावट करण्यासाठी रंगीबेरंगी पिस्त्याच्या कवचांचा वापर केला जाऊ शकतो.
हेही वाचा : Summer Diet : उन्हाळ्यात अवश्य खाव्यात या भाज्या, राहाल फिट आणि फाईन
Edited By – Tanvi Gundaye