गर्भवतींनो सावधान

र्‍हिसस निगेटिव्ह आई-आरएचचा वेळीच करा प्रतिबंध - भाग १, डॉ. स्वाती गायकवाड, मदरहूड हॉस्पिटल, खराडी(स्त्री रोगतज्ज्ञ व इनफरटीलीटी सल्लागार)

गर्भवती महिला
गर्भवती महिला

आपल्या सर्वांना माहीत आहे की, रक्ताच्या वर्गीकरणाच्या विविध प्रणाली आहेत आणि त्यापैकी एबीओ आणि र्‍हिसस (आरएच) या सामान्यपणे वर्गीकरणासाठी वापरल्या जातात. प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताचा एक प्रकार असतो (ओ, ए, बी किंवा एबी). प्रत्येक व्यक्तीचा र्‍हिसस किंवा आरएच फॅक्टरही असतो. यातून लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील एका प्रथिनाचे असणे किंवा नसणे ध्वनित होते. हे प्रथिन पेशीत असेल, तर ती व्यक्ती आरएच पॉझिटिव्ह समजली जाते, हे प्रथिन नसेल तर ती आरएच-निगेटिव्ह समजली जाते.

जेव्हा आरएच-निगेटिव्ह स्त्री आणि आर-एच पॉझिटिव्ह पुरुष यांच्यात संबंध येऊन गर्भधारणा होते तेव्हा आरएच हा घटक महत्त्वाचा होऊन बसतो. अशा परिस्थितीत विसंगती (इनकॉम्पॅटिबिलिटी) निर्माण होते आणि परिणामी नवजात अर्भकाला हेमोलिटिक (लाल रक्तपेशी नष्ट होणे) आजार होऊ शकतो. एरिथ्रोब्लाटोसिस फेटालिस/हायड्रॉप्स फेटालिसिस हे आजारही बाळाला होऊ शकतात. जन्माला आलेले अर्भक आरएच पॉझिटिव्ह असेल तर ही परिस्थिती निर्माण होते (अर्भक आरएच निगेटिव्ह असेल तर होत नाही). कारण, मातेकडून आलेली प्रतिद्रव्ये (अँटिबॉडीज) वारेमार्फत त्याच्यापर्यंत पोहोचल्याने ही समस्या निर्माण होते.

हे खालील टप्प्यांदरम्यान घडू शकते :
जन्म : जन्माच्या वेळी वार तुटते. मात्र, आईच्या व मुलाच्या रक्तपेशी मिसळतात त्या कोणत्याही टप्प्याला हे होऊ शकते.
गर्भपात
पतन (फॉल) : आईला गरोदरपणात झालेली दुखापत किंवा आघात
जन्मापूर्वी झालेल्या चाचण्या : इन्वेजिव चाचण्यांमुळे दुखापत तसेच परिणामी आई व गर्भाचे रक्त एकमेकांत मिसळण्याचा धोका असतो.

हेमोलिटिक आजार कसा होतो?
नवजात अर्भकामध्ये हेमोलिटिक आजार होण्याचे कारण म्हणजे आई व अर्भक/गर्भ यांच्या रक्तातील विसंगती. मातेच्या रोगप्रतिकार यंत्रणेला (इम्युन सिस्टम) गर्भाची रोगप्रतिकार यंत्रणा बाहेरची (फॉरेन) वाटते आणि मग त्या यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणात प्रतिद्रव्यांची (आयजीएम) निर्मिती होते. यातील लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे पहिल्या गरोदरपणात गर्भावर किंवा जन्माला येणार्‍या अर्भकावर याचा काहीही परिणाम होत नाही, कारण ही प्रतिद्रव्ये (अँटिबॉडीज) वारेचा (प्लॅसेन्टा) अडथळा ओलांडून पुढे जाऊ शकत नाहीत. मात्र, मातेची रोगप्रतिकार यंत्रणा ही माहिती साठवून ठेवते. भविष्यकाळात अशाप्रकारची प्रथिने पुन्हा आढळल्यास या माहितीचा वापर केला जातो. या प्रक्रियेला ‘आरएच सेन्सिटायझेशन’ असे म्हणतात. परिणामी या स्त्रीला पुन्हा गर्भधारणा झाली आणि गर्भ पुन्हा आरएच पॉझिटिव्ह असेल तर ही प्रतिद्रव्ये अत्यावश्यक लाल रक्तपेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. गर्भाच्या लाल रक्तपेशी जेव्हा आईच्या सिस्टेमिक चक्रात प्रवेश करतात तेव्हा छोट्या आकारमानाची प्रतिद्रव्ये (आयजीजी) तयार होतात. ही प्रतिद्रव्ये वार ओलांडून गर्भाच्या रक्तात प्रवेश करतात आणि त्याच्या शरीरातील आरएच-पॉझिटिव्ह पेशींशी लढू लागतात. प्रतिद्रव्ये पेशींना नष्ट करू लागल्यामुळे हेमोलिटिक आजाराची लक्षणे दिसू लागतात. अर्थात याचा मातेवर कोणताही परिणाम होत नाही.

बाळावर होणारा परिणाम
नष्ट झालेल्या लाल रक्तपेशींमधून बिलिरुबिन बाहेर पडल्याने पिवळट रंगाचे गर्भजल (अ‍ॅम्नियॉटिक फ्लूइड) बाहेर पडू लागते. नवजात अर्भकामध्ये अ‍ॅनिमिया, कावीळ, प्लीहेला सूज, पोटात किंवा फुप्फुसात पाणी होणे आदी आजार दिसून येतात. हायड्रॉप्स फेटालिस होऊ शकतो. यामध्ये गर्भाच्या संपूर्ण शरीराला प्रचंड सूज येते किंवा त्यात पाणी साचते. या विसंगतीचे गंभीर परिणाम म्हणजे बहिरेपणा, आकडी येणे, मेंदूला दुखापत. काही वेळा बाळ दगावूही शकते.

या विकाराची बाळात आढळणारी सामान्य लक्षणे म्हणजे अ‍ॅनिमियामुळे बाळ फिकट दिसणे, हृदयगती वाढणे (टॅकीकार्डिया), श्वसनाचा वेग वाढणे (टॅकीप्नीआ), शक्ती कमी होणे, त्वचेखाली सूज येणे, पोट मोठे होणे आदी.