मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ही एक अशी नैसर्गिक घटना आहे, जी सहसा 45 वर्षांनंतरच्या स्त्रियांमध्ये होते. मेनोपॉज ही अशी स्थिती आहे जेव्हा स्त्रीला सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही. तिची पाळी अनियमित होऊ लागते. व हळूहळू ती बंदच होते. काही स्त्रियांमध्ये, ही स्थिती 40 व्या वर्षापूर्वीच येते. यालाच प्री मॅच्युअर मेनोपॉ़ज म्हणतात. प्री मॅच्युअर मेनोपॉजची कारणे काय असू शकतात आणि त्यामुळे आरोग्याला काय हानी पोहोचू शकते हेच या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. वयाच्या 40 व्या वर्षापूर्वीच स्त्रीच्या अंडाशयाचे कार्य जेव्हा थांबते तेव्हा त्याला अर्ली मेनोपॉजत, प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात.
प्री मॅच्युअर मेनोपॉजची कारणे :
जेनेटिक फॅक्टर्स- काही अनुवांशिक कारणांमुळे म्हणजेच जेनेटिक फॅक्टर्समुळे देखील प्री मॅच्युअर मेनोपॉज होऊ शकतो. ज्या स्त्रियांना टर्नर सिंड्रोम किंवा फ्रेजाइल एक्स सिंड्रोम अशा समस्या आहेत त्यांना त्याचा हा धोका जास्त असतो. यामुळे त्यांच्यामध्ये प्री मॅच्युअर मेनोपॉजचा धोका वाढतो.
ऑटोइम्यून डिसऑर्डर- या स्थितीत, रोगप्रतिकारक यंत्रणा अंडाशयांवर हल्ला करू लागते, ज्यामुळे अंडाशय निकामी होऊ शकते. यामुळे प्री मॅच्युअर मेनोपॉज होऊ शकतो.
केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी- केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरली जाते, ज्यामुळे लवकर रजोनिवृत्ती होऊ शकते.
शस्त्रक्रिया- एंडोमेट्रिओसिस किंवा ओव्हेरियन ट्यूमर यांसारख्या आजारांमध्ये, कधीकधी शस्त्रक्रियेद्वारे दोन्ही अंडाशय काढून टाकावे लागतात, ज्यामुळेही अकाली रजोनिवृत्ती होऊ शकते.
प्री मॅच्युअर मेनोपॉजमुळे उद्भवणाऱ्या समस्या :
इंफर्टिलिटी- प्री मॅच्युअर मेनोपॉजमुळे अनियमित मासिक पाळी आणि अंडाशयांचे कार्य कमी झाल्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. यामुळे स्त्रीला गर्भधारणा होण्यास त्रास होऊ शकतो.
हार्मोनल बदल – अकाली रजोनिवृत्तीमुळे इस्ट्रोजेन आणि इतर प्रजनन संप्रेरकांच्या पातळीत बदल होतो. यामुळे मूड बदलणे, योनीमार्गात कोरडेपणा आणि शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसणे ही लक्षणे दिसू शकतात.
हाडांचे आरोग्य- हाडांची घनता राखण्यासाठी इस्ट्रोजेन अत्यंत आवश्यक आहे, परंतु अकाली रजोनिवृत्तीमुळे, इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते आणि ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
हृदयाचे आरोग्य- रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यात आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात एस्ट्रोजेन हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मात्र, प्री मॅच्युअर मेनोपॉजमुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.
त्यामुळे ज्या स्त्रिया प्री मॅच्युअर मेनोपॉजच्या समस्येतून जात आहेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्याची लक्षणे, आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित समस्यांचे व्यवस्थापन करण्याबद्दल बोलले पाहिजे. हार्मोन थेरपी आणि लाइफस्टाइलमधील बदल ही लक्षणे कमी करण्यासाठी खूप मदत करू शकतात. त्यामुळे याबाबत तुमच्या डॉक्टरांशी जरूर संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.
हेही वाचा : Rashmika Mandana : रश्मिका मंदाना इंडस्ट्री सोडणार? अभिनेत्रीने रिटायरमेंटबाबत केलेले वक्तव्य चर्चेत
Edited By – Tanvi Gundaye