आपण अनेकदा आपण कोथिंबीर वडी आणि अन्य प्रकारच्या वड्या खातो. अशातच आज आपण जुन्नर अहमदनगरची प्रसिद्ध असलेली गावरान पद्धतीची मासवडीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात साहित्य आणि कृती.
साहित्य-
2 वाटी बेसनपीठ
1 वाटी पांढरे तिळ
पाऊन वाटी शेंगदाणे
1/2 किलो कांदे
3 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या
1/2 वाटी बारीक चिरलेला लसूण
1 टेबलस्पून जिरे
1 टेबलस्पून ओवा
4 टेबलस्पून लाल तिखट
मिठ चवीनुसार
हिंगपुड चवीनुसार
1/2 टेबलस्पून हळद
1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती-
सुके खोबरे, तिळ, शेंगदाणे वाटीचे प्रमाण घ्यावे, नंतर कांदे बारीक चिरून घ्यावे, खोबरे किसून घ्यावे. आता तिळ, शेंगदाणे, किसलेले खोबरे, हे सगळे जिन्नस वेगवेगळे सुकेच भाजून घ्यावे. चिरलेला कांदा तेल घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत मिडीयम गॅसवर भाजून घ्या. बेसन पीठ शिजवण्यासाठी लाल मिरची, जिरं, ओवा, लसूण हे बारीक वाटून घ्यावे. गॅसवर पातेले ठेवून त्यात एक वाटी तेल घालून ते तापले की त्यात हळद व हिंग घालून वाटलेले मिश्रण घालावे आणि नंतर पाणी घालून त्याला उकळी आणावी आणि मग त्यात एका हाताने थोडे थोडे बेसन पीठ सोडावं आणि दुसऱ्या हाताने ते ढवळून घ्यावे.त्यात गुठळ्या होऊ नये याची काळजी घ्यावी. गॅस मध्यम आचेवर असावा. अशाप्रकारे बेसन शिजवून घ्यावे.
आता एक रुमाल ओला करून पोळी पाटावर अंथरुण त्यावर थोडा खोबऱ्याच्या किस व कोथिंबीर भुरभुरावे, त्यावर एक पळी भरुन गरम बेसण ठेवून ते पटापट हाताने थापून घ्यावे, त्याच्यावर सारण ठेवून त्याची रोल करावी आणि हाताने थापून त्याला माशाचा आकार द्यावा.थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.मासवडी तयार.
हेही वाचा- Recipe : कुरकुरीत कोथंबीरीच्या वड्या