पावसाळ्यात विविध रानभाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. अशातच पावसाळी रानभाज्या खाल्ल्याने त्याचे आरोग्यदायी फायदे होतात. तर आज आपण पावसाळ्यात खास बनवल्या जाणाऱ्या कर्टुल्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य –
पाव किलो कर्टुली, दोन बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, मीठ, नारळाचा चव, तेल, फोडणीचं साहित्य.
कृती-
हिरवी गार कोवळी कर्टुली धुवून घ्यावी. (पिवळट झालेली – टणटणीत बियांची कर्टुली घेऊ नये.) प्रत्येक कर्टुल्याचे दोन उभे भाग करून त्याच्या चकत्या कराव्या. बटाट्यांच्याही चकत्या कराव्या. कढईत ३ टेबलस्पून तेल घालून खमंग फोडणी करावी. त्यात कर्टुल्याच्या व बटाटाच्या चकत्या एकत्र करून टाकाव्या. किंचित मीठ भुरभुरावं. झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवावं. दोन सणसणीत वाफा काढाव्या. नंतर हिरव्या मिरच्या, लसूण व मीठ यांची पेस्ट करून ती भाजीत टाकावी. चिमुटभर साखर घालावी. चांगले हलवून भाजी खाली उतरावी. त्यावर ओल्या नारळाचा चव व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी. आवडत असेल तर थोडा लिंबाचा रस घालावा.
हेही वाचा- Monsoon Recipe : पावसाळ्यात करा अळूचं फदफदं