Recipe : उपवासात साबुदाण्याचे चटपटीत थालीपीठ नक्की ट्राय करा

अनेकदा उपासाला काय करावे असा बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडत असतो. त्यातच सातत्याने साबुदाणा खिचडी, वडा हे पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही साबुदाण्यापासून बनलेलं उपवासाचे थालीपीठ नक्की ट्राय करा

साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • 2 उकडलेले बटाटे
 • 2 वाटी भाजलेला साबुदाणा
 • 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
 • 5-6 हिरव्या मिरच्या (वाटलेल्या)
 • 1 चमचा तूप किंवा तेल
 • चवीनुसार मीठ

कृती :

 • सर्वप्रथम उकडलेला बटाटा किसणीवर बारीक खिसावा.
 • मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या.
 • भाजलेला साबुदाणा , शेंगदाण्याचे कूट, वाटलेल्या मिरच्या, खिसलेला बटाटा , चवीनुसार मीठ एकत्र करावे.
 • या सर्व मिश्रणामध्ये लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
 • या पीठाचे लहान-लहान गोळे करून घ्यावे आणि ते थालीपीठाप्रमाणे थापून घ्यावे.
 • एकीकडे गॅसच्या मध्यम आचेवर तवा तापत ठेवावा. तवा तापल्यानंतर त्यात तेल किंवा तूप घालावे.
 • थापलेले थालीपीठ झाकण ठेऊन मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
 • ५ मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ दुसऱ्या बाजूने घ्यावे.
 • तयार थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करावे.