असं मानलं जातं की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. या सणांनिमित्त करण्यात येणारे ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे ही एकच गोष्ट आहे असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही. ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची प्रक्रियाही वेगळी आहे. भारताचा ध्वज म्हणजेच आपला तिरंगा हा आपला अभिमान आणि आपली शान आहे. आपला राष्ट्रध्वज हे आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी या दिनानिमित्त तिरंग्याप्रती आदर व्यक्त केला जातो. पण अनेकांना ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातला फरक माहित नाही. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात की या दोन्ही प्रक्रियांमध्ये नेमका फरक काय आहे याविषयी.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण करतात. ध्वजारोहण म्हणजेच तिरंग्याला दोरीद्वारे खालून वर नेले जाते. आणि वर नेल्यानंतर ध्वज उघडून तिरंगा फडकवला जातो. स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांचा यूनियन जॅक खाली उतरवण्यात आला होता आणि तिरंगा वर चढवण्यात आला होता. म्हणूनच या प्रक्रियेला ध्वजारोहण असं म्हटलं जातं. स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहण लाल किल्ल्यावर केले जाते. पंतप्रधान या दिवशी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.
26 जानेवारी रोजी भारता्च्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा हा आधीच वर बांधलेला असतो. नंतर तो दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला ध्वज फडकवणं असं म्हणतात.
26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली राष्ट्रपतींना देशाचा घटनात्मक प्रमुख म्हटले जाते. अशा स्थितीत दरवर्षी राजपथावर देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षा दलाच्या तीनही दलांची परेड होते. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची राजपथावर परेड होते.
थोडक्यात स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती राजपथावर तिरंगा ध्वज फडकवतात.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांवर सतत चिडण्याऐवजी असे बना कूल पेरेंटस्
Edited By – Tanvi Gundaye