गणेश चर्तुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत केलं जातं. ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्व आहे. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते.
ऋषीची भाजी का केली जाते?
ऋषीपंचमीचं व्रत सुवासिनी महिला करतात. यादिवशी महिलांनी धान्य खायचे नसते. शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाहीत. म्हणूनच या दिवशी केवळ शेताच्या बांध्यावर उगवलेल्या भाज्या आणि कंदमुळे खाल्ली जातात.
ऋषीच्या भाजीसाठी कोणत्या भाज्या वापरल्या जातात?
ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते. या दिवशी ठरावीक पालेभाज्या, भोपाळ, भेंडी, गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते. त्यात लाल भोपळा,पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्याच बरोबर अंबाडी सुद्धा घातली जाते.
अळूची पानं, लाल देठं, रताळी, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, खोबरं घालतात, मिरच्या घातलात. यात मुख्य भाजी ही अळूची असते त्यात या सगळ्या भाज्या घातलया जातात.