गुलाबाला केवळ सौंदर्याचे प्रतीक मानले जात नाही, तर विविध पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. मिठाई सजवण्यापासून ते गुलकंद बनवण्यापर्यंत आणि कोरड्या पाकळ्यांपासून सरबत बनवण्यापर्यंत अनेक प्रकारे याचा वापर केला जातो. याशिवाय अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही गुलाबाचा वापर केला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का की गुलाबाचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, लोह आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स गुलाब चहामध्ये अर्थात रोझ टी मध्ये आढळतात. ही सर्व पोषक तत्त्वे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. या चहाच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यासही मदत होते. जाणून घेऊयात रोझ टी पिण्याचे नेमके फायदे काय आहेत याबद्दल.
गुलाब चहा पिण्याचे फायदे :
वजन कमी करण्यास उपयुक्त :
गुलाब चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे शरीरात चरबी जमा होण्याची प्रक्रिया कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय, गुलाब चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी रोझ टी चा आहारात समावेश करणे त्यांना फायदेशीर ठरू शकते.
त्वचेची चमक वाढवते :
गुलाबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मुळे त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा अधिक तरुण दिसू लागते. हे कोलेजन त्वचेवरील फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि डाग कमी करते. गुलाब चहाचे नियमित सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि तिला नैसर्गिक चमक देण्यास मदत होते.
तणावही होईल कमी :
गुलाब चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे मूड सुधारतो आणि शांत झोपदेखील लागते. व्यस्त जीवनशैलीत तणावापासून दूर राहण्यासाठी गुलाब चहा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
पचनशक्ती मजबूत करते :
गुलाबाच्या चहामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म पचनसंस्था मजबूत करतात. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासूनही यामुळे आराम मिळतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर :
गुलाबाच्या चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात. हे रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करते.
रोग प्रतिकारशक्ती वाढवतो :
गुलाबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि शरीराला संसर्गापासून वाचवते. सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दररोज या चहाचे सेवन केले जाऊ शकते.
गुलाब चहा कसा बनवायचा ?
एक कप पाणी उकळून घ्या.
त्यात काही वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि 5-7 मिनिटे झाकून ठेवा.
हा चहा गरम करून गाळून प्या.
तुम्ही त्यात मध किंवा लिंबाचा रस देखील घालू शकता.
या गोष्टींची घ्या काळजी:
गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी दररोज चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही लोकांना गुलाबाची ऍलर्जी असू शकते, म्हणून चहा पिण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या.
हेही वाचा : Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे करणार तब्बल 22 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन
Edited By – Tanvi Gundaye