श्रीनगरच्या खय्याम भागातील रहिवासी असलेल्या रुतबाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. एका तासात 250 ओरिगामी कागदी बोटी बनवून तिने हे यश मिळवले आहे. यापूर्वी हा विक्रम 150 बोटींचा होता, जो रूतबाने मोडला. रुतबा शौकतची ही कहाणी केवळ काश्मीरमधीलच नाही तर संपूर्ण भारतातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कोविड काळात रुतबाची कलेतील आवड हळूहळू वाढत गेली आणि त्यातूनच तिला इतिहास घडवण्याची प्रेरणा मिळाली. तिच्या कठोर परिश्रमाने तिने हे मोठे यश मिळवले आहे.
कागदी होडी बनवून विश्वविक्रम करणाऱ्या रुतबाने तीन वर्षे कठोर परिश्रम केले. या काळात, तिने यापूर्वीही दोनदा प्रयत्न केले होते जे अयशस्वी झाले होते परंतु रुतबाने हार मानली नाही.
गिनीज रेकॉर्ड धारक रूतबा म्हणते, “कलेमुळे माझे मन ताजेतवाने होते. तर खेळामुळे मी शारीरिकदृष्ट्या फिट राहू शकते. मी एक ऍथलेट आहे आणि कोविड दरम्यान सगळ्या ऍकेडमी बंद होत्या त्यामुळे मी कलाप्रकारात रस घेण्यास सुरूवात केली. मी निसर्गचित्र काढायचे आणि त्याच दरम्यान माझ्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली. आणि याच वेळी मी काहीतरी मोठं करण्याचा निर्णय घेतला. मी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सविषयी वाचलं आणि मी संशोधन करून त्यासाठीचा अर्ज भरला. मी ओरिगामी पेपर आर्टविषयी वाचलं होतं की एका मुलाने एका तासात 150 कागदी होड्या बनवल्या होत्या. आणि तेव्हाच मी एका तासात 250 कागदी होड्या बनवण्याचं ठरवलं आणि हे प्रत्यक्ष करूनही दाखवलं. व आधीचा रेकॉर्ड मोडला.”

रूतबा ही केवळ ओरिगामीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेती नाही तर ती मार्शल आर्ट्समध्ये राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेती देखील आहे. रूतबा ही एक ऍथलेट आहे आणि तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये 50 पेक्षा अधिक पदके जिंकली आहेत. तिची खोली मार्शल आर्टने मिळालेल्या पुरस्कारांनी भरलेली आहे. रुतबा शौकत ही एक कुशल सुलेखनकार आणि चित्रकार देखील आहे.रूतबाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट झाले आहे. परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नावाची नोंद होणे हे तिच्यासाठी स्वप्नवत होते.
रूतबाने दिलेला संदेश
रुतबा आताच्या काळातल्या महिलांना संदेश देत म्हणते की, “मुली एकतर लाजाळू असतात किंवा कुटुंबातील लोक त्यांना वेगळं काही करण्यापासून रोखतात, परंतु मुली स्वतंत्र असायला हव्यात आणि त्यांना लहान सुरूवात करायला लागली तरी त्यांनी ती केली पाहिजे.”
रुतबा शौकत हे यश केवळ तिच्या एकटीचे यश मानत नाही, तर तिला तिचा प्रवास काश्मीरच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान बनवायचा आहे. ती म्हणते की, ” जर एखाद्यामध्ये समर्पण आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.”
हेही वाचा : Fashion Tips : बेस्ट ऑक्सिडाइज्ड बांगड्या आणि ज्वेलरी
Edited By – Tanvi Gundaye