स्त्री शिक्षणाची आद्य प्रणेती, स्त्री मुक्तिदाती, स्त्री शिक्षणाची संस्थापिका अशी अनेक बिरूदं ज्यांच्या नावापुढे आपण लावतो. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले अर्थात साऊ. सावित्रीबाई ज्या आपलेपणाने समस्त महिलावर्गाच्या आणि शोषितांच्या आवाज झाल्या त्याच आपलेपणाने आणि हक्काने त्यांना साऊ म्हणूनही संबोधले जाते. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी 13 वर्षांच्या असणाऱ्या ज्योतिबांसमवेत लग्न. पुस्तकांमध्ये रमणाऱ्या आणि शिक्षणाचं महत्त्व जाणून असणाऱ्या ज्योतिरावांसोबतचा संसार, त्यांच्याच भरभक्कम आधारामुळे सावित्रीबाईंच्या हातात आलेली पाटी आणि लेखणी. या साऱ्याच घटकांनी सावित्रीबाईंच्या आयुष्यात आणि नंतर पर्यायाने समाजात क्रांती घडवून आणली.
मुलींना घराबाहेर पडण्यासही बंदी असताना सावित्रीबाई स्वत: पतीपाशी शिकते. एवढ्यावरच थांबत नाही तर समाजातील सर्व दुष्प्रवृत्तींना न जुमानता, प्रसंगी अंगावर शेणगोळे, दगडफेक झेलूनही मुलींसाठी पहिली शाळा उघडते. शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांकडून “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कलि आला….” असे सांगून करण्यात आले. हे सगळंच अंगावर काटा आणणारं!
केवळ स्त्री शिक्षण इथपर्यंतच सावित्रीबाईंचं काम मर्यादित राहिलं नाही. त्यांनी महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही हातभार लावला. त्या लेखिका आणि कवयित्रीही होत्या. महिलांच्या हक्कांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्या भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्यासुद्धा होत्या.त्यांनी महिलासांठी निवारास्थान उघडले, जेथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तेथे सोडू शकतात.त्यांनी स्वत: यशवंत या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले होते.सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलांसाठी घर सुरू केले.
सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंना लिहिलेल्या दुर्मीळ पत्रांमधून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. त्यांच्या एका पत्रातून जाणवतं की, आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण या दोन्ही गोष्टींकडे सावित्रीबाई गुन्हा म्हणून बघत नाहीत, त्या तरुणीला कलंकित मानत नाहीत तर एक सहज मानवी व्यवहार म्हणूनच त्या या सगळ्या घटनांकडे बघतात. एकोणिसाव्या शतकात 1876 आणि 1896 असे दोन मोठे दुष्काळ पडले होते. 1876-77 मधला दुष्काळ हा एकोणिसाव्या शतकातला सर्वांत भीषण दुष्काळ मानला जातो. या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या. याचे दाखले त्यांनी 1877 मध्ये ज्योतिबारावांना लिहिलेल्या पत्रातून मिळतात. टीकेला न घाबरता हाती घेतलेले काम करत राहावे, असं सांगत सावित्रीबाई कर्मसिद्धांतच मांडत होत्या.
सावित्रीबाईंच्या कार्याचा, त्यांनी महिलांसाठी घालून दिलेल्या पाऊलवाटेचा प्रवास आजही गावकुसाबाहेरच्या बाया असोत किंवा कॉर्पोरेटमधील फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या बायका असोत त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिलाय. आजही तिच्या कर्तृत्वाची ओवी घराघरात गुणगुणली जाते.
हेही वाचा : Benefits of Silver utensils : चांदीच्या भांड्यात जेवणाचे फायदे
Edited By – Tanvi Gundaye