सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. अमावस्येला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे.
मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5.21 पासून 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे. अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपणार असल्याने यादिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे. पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग 71 वर्षांनंतर जुळून आला आहे. 2 सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमूठ सातू असणार आहे.
श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या ही २ सप्टेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते, असं म्हणतात. या दिवशी प्रामुख्याने पिठाचेच पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात. घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणपती बाप्पा येतो त्या घरात ही अमावस्या साजरी केली जाते.
याच दिवशी मातृदिनही साजरा होतो. पिठोरी अमावस्येला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण समजला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो. सकाळी उठून बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणं लावून आंघोळ घातली जाते. व विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं. घरातील स्त्रिया बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो. ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवून त्याची पूजा करतात.
Edited By – Tanvi Gundaye