पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करता करता आताची पिढी बरीच पुढे गेली आहे. हे अनुकरण फक्त कपड्यांपुरते मर्यादित राहीलेले नसून खाण्यापिण्याच्या सवयींचेही अनुकरण होताना दिसत आहे. यातूनच आता फक्त तरुणचं नाहीत तर शालेय आणि कॉलेज तरुणी आणि महिलांमध्येही मद्यसेवनाबरोबरच धूम्रपानाचे क्रेझ वाढले आहे. याचाच दुष्परिणाम तरुणींच्या शरीरावर होत असल्याने कमी वयात पाळी जाणे म्हणजे अकाली मेनॉपॉजबरोबरच, लैंगिक आणि मासिक पाळीच्या समस्यांनी ग्रस्त तरुणींची संख्याही वाढत आहे.
सिगारेट ओढल्याने म्हणजेच धूम्रपानामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात हे सगळ्यांना माहीत आहे. सिगारेटमुळे कॅन्सर, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारखे गंभीर आजार होतात. प्रामुख्याने धूम्रपानामुळे स्त्रियांमध्ये मेनॉपॉजची सुरुवात लवकर होऊ शकते. तसेच ऑस्टिओपोरोसिसही होऊ शकतो.
साधारणत: ठऱाविक वयात महिलांना अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. महिलांमध्ये चाळीशी ओलांडल्यानंतर रजोनिवृत्तीची लक्षणे सुरु होतात. तर वयाच्या 50 व्या वर्षी, रजोनिवृत्ती पूर्णपणे येते. पण जर तुमची जीवनशैली खराब असेल तर मात्र मेनॉपॉजचा हा कालावधी कमी होतो. यात तुमच्या बऱ्यावाईट खाण्यापिण्याच्या सवयी महत्वाची भूमिका बजावतात. या वाईट जीवनशैलीतील एक सवय म्हणजे धूम्रपान.
धूम्रपान आणि अकाली मेनॉपॉज यांच्यातील संबंध समजून घेताना संशोधकांच्या असे निदर्शनास आले की धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा 18 महिने आधी लवकर रजोनिवृत्तीची प्रक्रीया सुरू होते. तर अतिधूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये मेनोपॉज प्रक्रीया सामान्य महिलांच्या मेनोपॉजच्या तुलनेत तीन किंवा चार वर्षांआधीपासूनच सुरू होते. त्यामुळे ज्या महिला अतिधूम्रपान करतात किंवा धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात सर्वाधिक वेळ असतात अशा महिलांमध्ये धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा अकाली रजोनिवृत्ती होण्याची शक्यता जास्त असते.
धूम्रपान केल्याने मेनोपॉज लवकर सुरू होतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी खूप घाम येतो. सिगारेटमधील निकोटीनसह इतर रसायने महिलांमधील इस्ट्रोजेनच्या पातळीत व्यत्यय आणतात. त्यामुळे महिलांची पाळी वयाआधीच जाते. लैंगिक समस्याही वाढतात. त्याचबरोबर धूम्रपानामुळे महिलांमध्ये हाडांशी संबंधित ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही वाढतो. धूम्रपानामुळे हाडांची झीज वाढते, फ्रॅक्चर आणि हाडांशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.