रसवंती गृहांची नावे ‘नवनाथ/कानिफनाथ’चं का असतात ओ?

रसवंती गृहांची नावे ‘नवनाथ/कानिफनाथ’चं का असतात ओ?

रसवंती गृह

आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय… अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ रसवंती गृहावर बसू लागले आहेत. ऊस पट्ट्यातलं कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली असो की दुष्काळात रमलेल नांदेड लातूर, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की आडमार्गावरचं जांभूळगाव. प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडी बाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवंतीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं. महाराष्ट्रात कुठे ही रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का?, की या बहुतांश रसवंती गृहांची नावे ‘नवनाथ किंवा कानिफनाथच’ का असतात? तर जाणून घ्या त्याची माहिती.

नवनाथ रसवंती गृहामागची कथा

साधारण सत्तर ते ऐंशी वर्षा पूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याती बोपगाव या गावातील शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. त्याकाळात साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता. अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथे गेल्यावर त्याला समजलं की इथे आपल्या उसाला भरपूर मागणी आहे. त्या काळात देशी उस असायचे. लहान मुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या उसाचे छोटे – छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्या तरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी अशा गावातील बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथे जातील तिथे दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांच्यात विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं.

त्यामुळे नवनाथ हेच नाव दिले

बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथस्वामी येथे तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदर तालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. येथील माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी नवनाथ तर कुणी काफिनाथ ठेवलं.

First Published on: April 19, 2019 9:07 PM
Exit mobile version