उन्हाळ्याला सुरूवात झाली असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवसातचं अचानक उष्मा वाढला आहे. यामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे. यामुळे या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करावे ते बघूया.
स्कार्फ, गॉगल
उन्हात बाहेर पडताना डोक्यावर स्कार्फ गुंडाळावा. डोळ्याच्या संरक्षणासाठी गॉगल वापरावा. बॅगेत पाण्याची बाटली, फळ ठेवावीत. काही व्याधी असतील तर औषधही जवळ ठेवावीत.
आंघोळ
उन्हाळ्यात तापमान अधिक असते. यामुळे हवेत उष्मा वाढतो. परिणामी आपण घामाघूम होतो आणि थंडावा मिळण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करतो. पण तुम्हाला माहीत आहे का याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. अनेकवेळा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे उन्हातून आल्यावर लगेचच थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
एसी
हल्ली ऑफिसपासून ते घरापर्यंत सगळ्यांकडेच एसी असतो. यामुळे बाहेरून उन्हातून आल्यावर आपण रिलॅक्स होण्यासाठी एसीसमोर बसतो. त्यामुळे तुम्हाला सर्दी, पडसे होऊ शकते. एवढेच नाही तर श्वसनाचेही विकार होऊ शकतात. धाप लागू शकते. यामुळे बाहेरुन आल्यावर लगेचच एसीसमोर बसू नये. शरीराचे तापमान नॉर्मल झाल्यावरच एसीमध्ये बसावे.
थंड पाणी
उन्हातून आल्यामुळे आपल्याला भरपूर घाम येतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. बॉडी डिहायड्रेड होते. यामुळे आपण उन्हातून आल्यावर फ्रीजमधले थंड पाणी गटागट पितो. पण असे केल्याने नुकसान होते. त्यापेक्षा साधे पाणी प्यावे.
बर्फ, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स
उन्हातून आल्यावर बरेचजण बर्फ टाकून थंड पाणी, किंवा आईस्क्रीम नाहीतर कोल्ड ड्रिंक पिणे पसंत करतात. पण त्यामुळे सर्दी, खोकला आणि घशाला त्रास होऊ शकतो.
आराम
उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर पडत असते. त्यामुळे शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी थकवा येणे, डोळ्यासमोर अंधार येणे, चक्कर येणे, गरगरणे असा त्रास होऊ शकतो. यामुळे बाहेरून आल्यावर पाच दहा मिनिटं शांत बसावे. लगेचचं कामाला लागू नये. शरीराचे तापमान नॉर्मल झाल्यावरच उठावे.
फळं
उन्हाळ्यात फळे किंवा त्याचे ज्यूस प्यावे. जसे की नारळपाणी, कलिंगड, टरबूज, लिंबू रस, संत्र, मोसंबी यासारखी रसाळ फळ खावीत. किंवा त्यांचा ज्यूस प्यावा. त्यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते.
बीपी, डायबिटीस
ज्यांना बीपी आणि डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. नियमित शुगर टेस्ट करावी. त्यानुसार आहार घ्यावा. उन्हाचा इन्सुलिनवर परिणाम होतो त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
बीपी असलेल्या व्यक्तींनी दररोज लिंबू पाणी प्यावे. जर शुगर, बीपी कंट्रोल मध्ये असेल तर चिमूटभर साखर आणि मीठ टाकून लिंबू पाणी प्यावे. अन्यथा फक्त लिंबू पाणी प्यावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे.
स्ट्रोक
उन्हाळ्यात बीपी असलेल्यांना स्ट्रोकचा धोका असतो. यामुळे बाहेर जाताना शरीर डोक झाकूनच बाहेर पडावे. सतत पाणी प्यावे. डोकेदुखी, चक्करचा त्रास वाढल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.