फटाके दिवाळीच्या सणाचा एक महत्वाचा भाग आहे. आता फटाके दिवाळीलाच नाही तर प्रत्येक सणाला किंवा शुभ प्रसंगी फटाके फोडले जातात. दिवाळीत फटाके फोडण्याचा प्रघात कधी पडला हे सांगणे अवघड आहे. परंतु आता लहान मुलांपासून ते तरूणांपर्यत प्रत्येकाला दिवाळीत फटाके फोडायला खूप आवडतात. फटाके फोडणे हे पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. आज आपण जाणून घेऊयात, दिवाळीत फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी.
मोकळ्या जागेत फटाके फोडावे
फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडावे, अशा परिसरात जेथे कोणी सहसा येत नाही. जास्त लोकवस्ती असलेल्या भागात फटाके फोडणे लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.
फटाके फोडताना चेहरा फटाक्यांपासून लांब ठेवा
तुम्ही फटाके फोडताना तुमचा चेहरा फटाक्यांपासून लांब ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. फटाक्यांमध्ये खूप दारू भरलेली असते. त्यामुळे हे फटाके कधीही फुटू शकतात. त्यामुळे तुमचा चेहरा फटाक्यांपासून लांब ठेवा.
फटाके हाताने फोडू नका
आजकालची युवापिढी किंवा लहान मुलं मस्तीमध्ये फटाके हाताने फोडतात. मस्करीची कुस्करी होते त्यामुळे असे जीवघेणे पराक्रम करू नका.
फटाके फोडण्यापूर्वी पायात चपला घालाव्यात
फटाके फोडण्यापूर्वी पायात चपल घालणे गरजेचं आहे. पायात चप्पल न घालता फटाके फोडले तर तुमच्या पायला इजा होऊ शकते.
फटाके फोडण्यापूर्वी पॅकेटवर लिहिलेल्या सूचना वाचा
बऱ्याचदा काही फटाके खूप घातक असतात . त्यामुळे फटाके फोडण्यापूर्वी पॅकेटवर लिहिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा
लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा. हे फटाके मुलांच्या आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते.
हेही वाचा : Diwali 2024 : हे फटाके दिवाळीला फोडण्याचे टाळा
Edited By : Prachi Manjrekar