त्वचेवर आपल्या आवडीचे डिझाइन हवे असल्यास अनेक लोक आपल्या शरीरावर टॅटू काढून घेतात. कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द किंवा वाक्य जे आपल्याला खूप आवडते किंवा जे आपल्याला प्रेरणा देते, जीवनाबद्दल काहीतरी संदेश देणारे कोणतेही प्रतीक, अशा अनेक गोष्टी काहीजणांना आपल्या शरीरावर टॅटूच्या रूपात कोरून घ्यायच्या असतात. टॅटू हा एक असा ट्रेंड आहे जो बऱ्याच वर्षांपासून फॅशनमध्ये आहे. काही लोकांना टॅटूची इतकी क्रेझ असते की ते त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू काढतात. टॅटू काढणं जरी सुरक्षित असलं तरी जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर ते तुम्हाला खूप महागात पडू शकते. म्हणूनच, जर तुम्हीही टॅटू काढण्याचा विचार करत असाल, तर टॅटू काढत असताना आणि त्यानंतर काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल तुम्हाला आवश्यक ज्ञान असायला हवे. संसर्ग टाळण्यासाठी टॅटू काढल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
टॅटू काढताना या गोष्टी लक्षात ठेवा:
टॅटू काढणे खूप आनंददायी असू शकते, परंतु उत्साहाच्या भरात कोणत्याही टॅटू सलूनमध्ये जाऊ नका. सलून निवडण्यापूर्वी, ते नेहमी स्वच्छ आणि आरोग्यदायी आहे की नाही याची खात्री करून घ्या. टॅटू बनवण्यासाठी वापरण्यात येणारी सुई निर्जंतुक आहे की नाही याकडे लक्ष द्या.
टॅटू काढल्यानंतर घ्या ही खबरदारी :
टॅटू बनवल्यानंतर टॅटू आर्टिसट त्यावर पट्टी लावतो. टॅटूला संसर्गापासून वाचवण्यासाठी ही पट्टी खूप महत्त्वाची आहे. म्हणून, टॅटू काढल्यानंतर, नेहमी खात्री करून घ्या की आपल्या टॅटू आर्टिस्टने आपला टॅटू नीट झाकला आहे की नाही.
इच्छेनुसार पट्टी काढू नका. तुमचा टॅटू कलाकार तुम्हाला योग्य ती वेळ सांगेल, त्यानंतरच पट्टी काढा. टॅटू कसा दिसतो हे पाहण्यासाठी सतत पट्टी काढून पाहत बसू नका.
पट्टी काढण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. टॅटू बरा होण्यापूर्वी, घाणेरड्या हातांनी स्पर्श केल्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
पट्टी काढून टाकल्यानंतर, हलक्या अँटी-बॅक्टेरियल साबण आणि कोमट पाण्याने टॅटू धुवा आणि मऊ किंवा स्वच्छ टॉवेलने कोरड्या टॅटूला हळूवारपणे सुकवा. सुकवताना लक्षात ठेवा की टॅटू अजिबात रगडू नका, उलट त्याला हलकेच थोपटून कोरडं करा.
तुमच्या आर्टिस्टने सांगितल्याप्रमाणे टॅटूला मॉइश्चरायझ करा, परंतु यावेळी टॅटू झाकण्याऐवजी उघडा ठेवा. तुमच्या टॅटू आर्टिस्टने शिफारस केलेले मॉइश्चरायझर किंवा सुगंध नसलेले मॉइश्चरायझर वापरा.
दिवसातून दोनदा टॅटू धुवा आणि दिवसातून अनेक वेळा मॉइस्चराइज करा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल आणि टॅटूमध्ये खाज सुटणे व त्याला येणारा कोरडेपणा देखील टाळता येईल.
टॅटू काढलेल्या ठिकाणी भरपूर प्रमाणात खाजही येऊ शकते. या खाजेमुळे टॅटूची रचनाही खराब होऊ शकते. यासाठीच खाजेवर उपाय म्हणून योग्य सोल्युशनचा वापर करा. जर त्वचा पूर्णपणे झाली नाही तर संसर्ग देखील होऊ शकतो.
टॅटू काढल्यानंतर, त्वचा बरी होईपर्यंत पोहायला जाऊ नका. जलतरण तलावाच्या पाण्यात जीवाणू असू शकतात, जे टॅटूच्या त्वचेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू शकतात.
सूर्यप्रकाशापासून टॅटूचे संरक्षण करा. सूर्यप्रकाशामुळे, टॅटूची शाई फिकट होऊ शकते, ज्यामुळे डिझाइन देखील खराब होऊ शकते. सूर्यप्रकाशातील हानिकारक अतिनील किरणं देखील त्वचेला हानी पोहोचवू शकतात, म्हणून टॅटू केलेल्या भागाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा. आवश्यक असल्यास सनस्क्रीन वापरा.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांचा स्क्रीनटाइम असा करा कमी
Edited By – Tanvi Gundaye