भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नावर कर लावण्यात येतो. अशा स्थितीत अनेक वेळा करात मोठी रक्कम भरावी लागते. अशा परिस्थितीत कर टाळून पैसे मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. भारतातील आयकर कायद्यांतर्गत, उत्पन्नाचे काही असे स्त्रोत आहेत जे करमुक्त आहेत. जर तुम्हाला तुमच्या कमाईवर कोणताही कर लागू नये असे वाटत असेल तर जाणून घेऊयात अशा काही पद्धती ज्यांच्या माध्यमातून कर टाळता येऊ शकतो.
या करमुक्त पद्धतींद्वारे, तुम्ही केवळ चांगली कमाई करू शकत नाही तर तुमचे उत्पन्न कायदेशीररित्या संरक्षित देखील ठेवू शकता. तसेच, स्मार्ट प्लॅनिंग करून आणि योग्य गुंतवणूक करुन तुम्ही तुमची कमाई वाढवू शकता. आज आपण जाणून घेऊयात भारतातील उत्पन्नाच्या अशा काही स्त्रोतांबद्दल, ज्यामध्ये तुम्हाला कर भरावा लागणार नाही.
शेतीतून मिळू शकते करमुक्त उत्पन्न :
कृषी उत्पन्न हा भारतातील सर्वात लोकप्रिय करमुक्त उत्पन्न स्त्रोत आहे. आयकर कायदा, 1961 च्या कलम 10(1) नुसार, शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. भारतात कृषी उत्पन्नावर कोणताही कर नाही. तुमच्याकडे लागवड करण्याजोगी जमीन असेल तर तुम्ही शेतीशी संबंधित कामे करू शकता जसे की पिके वाढवणे, फळे आणि भाज्या लावणे किंवा बागकाम. तुम्ही सेंद्रिय उत्पादने किंवा कृषी पर्यटनातून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवू शकता.
भेट म्हणून मिळालेला पैसा हा देखील एक स्रोत :
भेटवस्तू करमुक्त मानली जात असली तरी त्यात काही नियम आहेत. आयकर कायद्यानुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त असतात. या भेटवस्तूमध्ये मालमत्ता, रोख रक्कम, दागिने किंवा वाहने इत्यादींचा समावेश असू शकतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून, भावंडांकडून, पालकांकडून आणि इतर जवळच्या नातेवाईकांकडून अशा मौल्यवान भेटवस्तू मिळत असतील तर त्या सर्व करमुक्त आहेत.
विम्यामधून मिळणारे पैसे :
लाइफ इन्शुरन्समधून मिळणारे पैसे आणि बोनस देखील करमुक्त आहेत. आयकर कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत, 1 एप्रिल 2003 पूर्वी जारी करण्यात आलेल्या पॉलिसीज करमुक्त आहेत. तर 1 एप्रिल 2003 आणि 31 मार्च 2012 दरम्यान जारी करण्यात आलेल्या पॉलिसींसाठी काही कर सूट आहे, मात्र यासाठी प्रिमियम हा विमा रकमेच्या 20% पेक्षा जास्त नसावा. एप्रिल 1, 2012 नंतर जारी केलेल्या पॉलिसींमध्ये, ही मर्यादा 10% पर्यंत कमी करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 नंतर, जर एकूण प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या रकमेवर नियमांप्रमाणे कर लागू शकतो.
ग्रॅच्युइटीतून मिळालेले पैसे :
कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर दिली जाणारी रक्कम म्हणजे ग्रॅच्युइटी. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण ग्रॅच्युइटी करमुक्त असते. तर निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी थोडे वेगळे नियम आहेत. याव्यतिरिक्त, या कायद्यानुसार, कमाल 20 लाख रुपये करमुक्त असतात.
पेन्शनमधून मिळणारे पैसे :
काही पेन्शन देखील करमुक्त आहेत. यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मिळालेल्या पेन्शनचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन देखील करमुक्त असते. याशिवाय परमवीर चक्र आणि महावीर चक्र या पुरस्कार विजेत्यांची पेन्शन देखील करमुक्त आहे.
हेही वाचा : Kitchen Tips : हिवाळ्यात फ्रीजचा वापर करावा सांभाळून, अन्यथा..
Edited By – Tanvi Gundaye