हिवाळ्यात आपल्याला नेहमी काहीतरी गरम खावे किंवा प्यावेसे वाटते. भारतातील किंवा जगभरातील ९० टक्के लोकांची सकाळ चहा किंवा कॉफीच्या कपाशिवाय सुरू होत नाही. काहींना सकाळी चहा प्यायला आवडते तर काहींना कॉफी पिणे आवडते. तुमच्या लक्षात आले असेल की लोक थंडीच्या दिवसात जास्त चहा किंवा कॉफी पिऊ लागतात. भारतात तर चहा आणि कॉफी प्रेमी लोकांची अजिबात कमतरता नाही. पण जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे हानिकारक ठरू शकते. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोघांपैकी कोणते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते? जर आपण कॅफिनबद्दल बोललो तर कॉफीमध्ये चहापेक्षा जास्त कॅफिन असते. चहामध्ये निकोटीन आणि कॅफीन देखील असते पण जेव्हा आपण ते फिल्टर करतो तेव्हा त्याचा प्रभाव कमी होतो. यासाठीच जाणून घेऊया, चहा किंवा कॉफीपैकी नेमके कोणते पेय आरोग्यासाठी चांगले आहे याबद्दल.
थंडीत चहा पिण्याचे फायदे
हिवाळ्यात चहा प्यायल्याने आपले शरीर आतून उबदार राहते. थंडीच्या दिवसात आले, तुळस, काळी मिरी आणि लवंगा यासारखे आयुर्वेदिक पदार्थ वापरून तुम्ही तुमचा चहा आरोग्यदायी बनवू शकता. यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. वास्तविक, चहामध्ये अँटीऑक्सिडंट्ससारखे घटक आढळतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि थंडीत रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात. हिवाळ्यात मसाला चहा किंवा आल्याचा चहा प्यायल्यास सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो. याशिवाय हर्बल आणि ग्रीन टीमुळे आपली पचनशक्ती
सुधारते.
थंडीत कॉफी पिण्याचे फायदे
कॉफीमध्ये असलेले कॅफीन आपल्याला कायम ताजे आणि उत्साही ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यातील सुस्ती कमी करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. थंडीत कॉफी प्यायल्यास शरीरातील पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे थंडीत शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय, कॉफी लक्ष आणि एकाग्रता वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कॉफी देखील अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हिवाळ्यात कॉफी प्यायल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
तज्ज्ञ काय म्हणतात ?
तज्ज्ञांच्या मते,चहा कॉफीपेक्षा चांगला आहे कारण त्यात कॅफिन कमी असते. पण ते बनवण्याच्या प्रक्रियेतही फरक पडतो. जर तुम्ही हे दोन्ही जास्त वेळ शिजवले तर अँटिऑक्सिडंट्सवर परिणाम होतो, जे आरोग्यासाठी चांगले नाही.
याशिवाय तुम्ही त्यात किती साखर घालता हेदेखील महत्त्वाचे आहे. जास्त साखर घालणे आरोग्यासाठी चांगले नाही.
दोघांपैकी कोणते चांगले आहे?
जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल आणि हिवाळ्यात होणारे सामान्य आजार टाळायचे असतील तर चहा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. थंडीच्या दिवसात फक्त हर्बल चहा पिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला उर्जेची गरज असेल आणि कामाच्या दरम्यान सतर्क राहण्याची गरज असेल तर कॉफी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा : Premature Menopause : ही आहेत प्री मॅच्युअर मेनोपॉजची लक्षणे
Edited By – Tanvi Gundaye