यावर्षी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी जप, तपस्या आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान दुप्पट फळ देते, असं म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाच्या घरी सूर्य येतो. या दिवशी सूर्य शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करेल. पौराणिक कथेनुसाकर, पूर्वी शनिदेवाची राशी कुंभ होती. पण, जेव्हा सूर्यदेव शनिदेवावर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी त्यांना दुसरी राशी दिली, ती म्हणजे मकर. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आणि शनी यांची कथा वाचून शनिदोषापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. यासाठीच जाणून घेऊया मकर संक्रांतीची गोष्ट.
मकर संक्रांतीची कथा :
पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव आणि शनिदेव यांचे संबंध चांगले नव्हते. याचे कारण म्हणजे शनीची माता छाया यांच्याशी सूर्यदेवाचे वागणे. वास्तविक, शनिदेवाच्या काळ्या रंगामुळे, सूर्यदेवाने त्यांच्या जन्मावेळी सांगितले होते की, मला असा मुलगा होऊ शकत नाही. यानंतर सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांची आई छाया यांना वेगळे केले होते. तो राहत असलेल्या घराचे नाव कुंभ होते.
सूर्यदेवाच्या अशा वागण्याने संतप्त होऊन छायाने त्याला शाप दिला. तिने सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता. याचा राग येऊन सूर्यदेवाने छाया आणि शनिदेव यांचे घर जाळून राख केले. सूर्यदेवाचा पुत्र यम याने सूर्यदेवाला त्या शापातून मुक्त केले. याशिवाय, त्यांनी आपल्या आईच्या म्हणजेच छाया यांच्याशी असलेल्या वागणुकीत बदल घडवून आणावा, अशी मागणीही सूर्यासमोर ठेवण्यात आली.
सूर्यदेव छाया आणि शनिदेवाला भेटायला आले :
त्यानंतर सूर्यदेव छाया आणि शनिदेवाच्या घरी पोहोचले. जेव्हा सूर्यदेव तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की तेथे काहीही नाही, सर्व काही जळून खाक झाले आहे. यानंतर शनिदेवाने वडिलांचे काळे तीळ घालून स्वागत केले. शनिदेवाच्या अशा वागण्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्या दिवशी त्यांना मकर नावाचे नवीन घर दिले. यानंतर शनिदेव कुंभ आणि मकर या दोन राशींचा स्वामी झाला. शनिदेवाच्या या वागण्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला असेही सांगितले की जेव्हाही मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेव सूर्याच्या घरी येतील तेव्हा त्यांचे घर धन-धान्याने भरून जाईल. त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही. या दिवशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने मला काळे तीळ अर्पण करणाऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल, असेही सूर्यदेव सांगतात. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेमध्ये काळ्या तिळाचा वापर केल्यास व्यक्तीच्या घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
असा साजरा होतो महाराष्ट्रात हा सण :
मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” म्हणत तिळगूळ देण्याची देखील प्रथा आहे. तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगूळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगूळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी, असे म्हणतात. सुवासिनी या दिवसांमध्ये हळदीकुंकवाचे आयोजन करतात आणि लहान मुले पतंग उडवण्यात व्यस्त असतात.
हेही वाचा : Womens Health : साखरेचे पदार्थ महिलांसाठी हानिकारक
Edited By – Tanvi Gundaye