घरलाईफस्टाईलकुष्ठरोगाचं बदलतं स्वरूप सांगणारं भारतातील पहिलं संग्रहालय मुंबईत

कुष्ठरोगाचं बदलतं स्वरूप सांगणारं भारतातील पहिलं संग्रहालय मुंबईत

Subscribe

आपण आतापर्यंत अनेक संग्रहालय बघितली असतील. पण, कधी एखादा आजार सांगणारं संग्रहालय बघितलं आहे? कदाचित तुमचं उत्तर नाही असंच असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा रोगाच्या संग्रहालयाविषयी माहिती देणार आहोत जे वाचून तुम्हाला सुखद धक्का बसू शकतो.

कधी एकेकाळी महारोग म्हणून ओळख असलेल्या कुष्ठ रोगाचं वास्तव आणि त्याचं बदलत स्वरूप या संग्रहालयात दाखवण्यात आलं आहे. त्यावेळी कृष्ठ रोगासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लढा देण्यासाठी सज्ज झालेल्या व्यक्तींनीच पुढच्या पिढीला नेमका कुष्ठरोग कसा होतो? त्याची कारणं काय आहेत? शिवाय तीव्र स्वरूपाचा कुष्ठरोग कसा होता? आता त्याचं स्वरूप कसं बदललं? त्यावर कोणकोणत्या औषधांचा वापर केला जायचा? या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि अहवाल या अकवॉर्थ कुष्ठरोग संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आजही समाजात कुष्ठरोगाविषयी भीती आहे. आपण आजही कुष्ठरोगाला स्विकारलं नाही. पण, समाजातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी कुष्ठरोगाविषयी पसरणारी भीती कमी करण्यासाठी आणि अशा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यापैकीच एक म्हणजे हॅरी अ‍ॅक्वर्थ. अ‍ॅक्वर्थ यांनी कुष्ठरोगी व्यक्तींसाठी मुंबईतील पहिलं ‘द होमलेस लेपर असायलम’ म्हणजेच रुग्णालय उभारलं. ७ नोव्हेंबर १८९० साली भारतातील पहिलं असायलम स्थापन करण्यात आलं. या रुग्णालयात आजही काही वर्षांपूर्वी दाखल झालेले पण आता ते कुष्ठरोग मुक्त असलेले रुग्ण राहतात. हे असायलम बांधण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या कुष्ठरोगी व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांनी घरातून नाकारलं, समाजातून नाकारलं अशा व्यक्ती या असायलममध्ये येऊन राहायला लागले. हा सर्व इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून १९५० साली कुष्ठरोग या विषयावर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हे संग्रहालय फक्त मुंबईतीलच नाही तर जगातील पहिलं अ‍ॅक्वर्थ कुष्ठरोग संग्रहालय ठरलं. ज्याचं उद्घाटन ५ फेब्रुवारी २००३ साली महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते झालं. १८४९ ते १९३३ या सालात हॅरी अकवर्थ हे या असायलमच्या महापालिकेच्या आयुक्तपदी होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई हे आर्थिक सुबत्ता असलेलं शहर होतं.

- Advertisement -

मुंबईत देशाच्या कानाकोपर्‍यातून बेघर, बेरोजगार रोजगाराच्या शोधात येत होते. त्यात मोठ्या संख्येने भिक मागून पोट भरणारे कुष्ठरोगी होते. त्यावेळी या व्यक्तींबद्दल समाजात संमिश्र भावना होत्या. एकीकडे सहानुभूती आणि दुसर्‍या बाजूला या रोगामुळे नकोशा झालेल्या या रुग्णांची व्यवस्था कशी आणि कुठे करावी हा मोठा प्रश्न कायदा आणि आरोग्य विभागापुढे होता. या प्रश्नावर मार्ग काढणं गरजेचं होत म्हणून ऍकवर्थ यांनी पुढाकार घेत समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची मुंबईतील ‘पेटिट हॉल’ येथे बैठक घेतली. या बैठकीतून कुष्ठरोग व्यवस्थेसाठी स्वतंत्र ‘होमलेस लेपर फंड’ निर्माण झाला. १ लाख ३३ हजार एवढा फंड १८९० साली जमा करण्यात आला. त्यानंतर माटुंगा येथील रिकाम्या ‘आर्टिलरी बॅरेक्स’ या असायलमसाठी देण्यात आल्या. या कुष्ठरोग रुग्णांची जबाबदारी नेमकी शासनाची की महापालिकेची यावरून वाद झाल्यानंतर दोन्ही यंत्रणांनी निम्मा – निम्मा खर्च करायचं ठरवलं.

केस स्टडी

१६ व्या वर्षात तामिळनाडूतून मुंबईत आलेल्या लक्ष्मी (बदललेलं नाव) पुन्हा परतल्याच नाहीत. आपल्याला कुठला तरी भयानक आजार झाला आहे, असा समज कुटुंबियांसह सर्व समाजाला झाल्यानंतर उपचारांसाठी मुंबईत आलेल्या लक्ष्मी यांना मुंबईकरांनी आपलंस केलं आणि अक्का इथेच राहिल्या. ज्या वयात लक्ष्मी मुंबईत आल्या होत्या, त्या वयात आपल्याला झालेल्या रोगाचं नावही त्यांना माहीत नव्हते. पण नंतर कोणीतरी सांगितलं की तुला महारोग झालाय…विचार करत असाल की महारोग म्हणजे काय? महारोग म्हणजे कुष्ठरोग. ज्याचं स्वरूप आधीच्या काळात फारच भयानक होत. याच रोगा पायी लक्ष्मी आपलं रोजचं जगणं सोडून मुंबईत आल्या आणि आजतागायत त्या वडाळा इथल्या अ‍ॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयात राहत आहेत. लक्ष्मीसारखे असे अनेक कृष्ठरोग बाधित व्यक्ती आजही या कुष्ठरोग रुग्णालयात राहत आहेत.

- Advertisement -

रेक्लातून बसवून आणत रुग्णांना –

कुष्ठ रोग रुग्णाला त्यावेळेस रेक्ला म्हणजेच बैलगाडीतून बसवून रुग्णालयात आणलं जायचं. हळूहळू रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यावेळी डॉ. नसरवान जी. चोक्सी हे वैद्यकीय अधीक्षक होते. त्यांनी त्यांच्या अहवालात ही गाथा प्रसिद्ध केली आहे.

धार्मिक भावनेसाठी उभारली देवस्थाने –

रुग्णालयात दाखल झालेल्या कुष्ठरोगी रुग्णांसाठी अ‍ॅक्वर्थ यांनी रुग्णालय परिसरात प्रार्थनास्थळे बांधली. मंदिर, मस्जिद आणि चर्च ही प्रार्थनास्थळे आजही या गोष्टीची साक्ष देतात. आजही या असायलममध्ये राहत असलेल्या कुष्ठरोग बाधीत व्यक्ती आपापल्या धर्माप्रमाणे सण साजरे करतात.

शिवाय, त्यांचा वेळ जावा म्हणून त्या काळात त्यांना काही कामं देखील नेमून देण्यात आली होती. त्यात शिलाई काम, झाडू मारण्याचं काम, बनवलेले जेवण वाढण्याचे काम या आणि अशा बर्‍याच कामांमध्ये या रुग्णांचं मन रमायचं. १८४९ या काळात किंवा त्याच्याही आधी कुष्ठरोगावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जायचे. वेगवेगळ्या फळांचा काढा दिला जायचा. फळांपासून तेल बनवून ते शरीराला लावलं जायचं. त्या सर्व उपचारांचा संदर्भ या संग्रहालयात आजही जपून ठेवण्यात आला आहे.

जसजसे विज्ञान आणि तंत्रज्ञानात बदल होत गेले तसतसे या रोगाच्या नियंत्रणासाठी करण्यात येणार्‍या उपचारांचं स्वरुपही बदललं. त्यातूनच मग, कुष्ठरोग पूर्णपणे कसा बरा केला जाऊ शकतो यासाठी प्रयत्न केले गेले. सांसर्गिक कुष्ठरोग कुठला आणि असांसर्गिक कुष्ठरोगाला कशा पद्धतीचे औषध दिले तर तो रुग्ण बरा होऊ शकतो याचा शोध घेतला गेला. १८७४ नंतर बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून एम. डी. टी. ब्लिस्टर हे ड्रग्स उपलब्ध झालं जे आजही डॉक्टर नव्याने आढळणार्‍या कुष्ठरोग रुग्णांना देतात. पण, आता या रोगाची लक्षणे, तीव्रता कमी झाली असल्याकारणाने जवळपास १०० रुग्णांमध्ये फक्त २ रुग्ण आढळतात. तर, आजही महिन्याला जवळपास ५० ते ६० रुग्ण अ‍ॅक्वर्थ रुग्णालयात तपासणीसाठी येतात. तर, दिवसाला ३ ते ४ रुग्ण वेगवेगळ्या परिसरातून येत असल्याचं रुग्णालय प्रशासनातून सांगण्यात आलं आहे.
तर, कुष्ठरोग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१७-१८ या वर्षात ४३२ कुष्ठरोग रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर, एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ५९ रुग्ण आढळले आहेत. तर, २०१६-१७ मध्ये ४५७ रुग्ण आढळले होते आणि २०१५-१६ मध्ये ४७७ रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे.

” कुष्ठरोग रुग्णाच्या निदानासाठी ११ रिपोर्टींग युनिट आहेत. त्यातून आम्हाला अहवाल मिळत असतो. त्यानुसार गेल्या ३ वर्षांत १ हजार ४२५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ’
-डॉ. राजू जोटकर, असिस्टंट डायरेक्टर हेल्थ सर्विस, लेप्रसी

-भाग्यश्री भुवड

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -