सध्या मस्त पावसाला सुरुवात झाली आहे. जवळपास रोजच पाऊस बरसत आहे. त्यामुळे आपल्या बागेतील झाडांमध्येही सध्या एक वेगळाच टवटवीतपणा आलेला दिसतोय. प्रत्येकाला घराची बाग फुलझाडांनी सुशोभित असावी असं वाटत असतं. अशा परिस्थितीत अशा काही वनस्पती, फुलझाडे (plant) घराभोवती लावता येतात, जे तुमच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ करतात. ही झाडे दारात किंवा बाल्कनीमध्ये लावल्यास डासांना घरात प्रवेश करण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखण्यास मदत होईल.
झेंडू
झेंडूचं रोप पावसाळ्यात लावलं जातं कारण पावसाळा संपण्याच्या काळात झेंडूला बहर येतो. घराच्या कुंडीतही झेडूंचे रोप छान वाढते. शिवाय या झाडाला विशेष निगा राखण्याची गरज नसते. तुमच्या घरात वापरलेल्या जुन्या फुलांमधील बिया तुम्ही कुंडीत पेरल्या तरी त्यातून झेडूंचे रोप उगवते.
मोगरा
मोगऱ्याचं रोप किंवा मोगऱ्याचा कलम लावायचा असेल तरी तो याच दिवसांत लावावा. साधारण थंडी संपून जेव्हा ऊन वाढू लागतं तेव्हा मोगऱ्याला कळ्या यायला सुरुवात होते आणि एप्रिल- मे या दिवसांत तर मोगरा अगदी बहरून जातो. त्यामुळे त्या सिझनमध्ये मोगऱ्याला भरपूर फुलं येऊन त्यांचा धुंद सुवास अनुभवायचा असेल तर सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत मोगरा लावा.
जाई-जुई
चमेली- सायली या वेलींचा बहराचा काळ म्हणजे हिवाळा. त्यामुळे आताच त्यांची रोपं लावा. म्हणजे तोपर्यंत त्यांची चांगली वाढ होऊन अंगणात त्यांचा छान सुवास दरवळेल.
कडुलिंब
कडुलिंब हे कीटकनाशक मानले जाते. पूर्वीच्या काळी लोक कडुलिंबाची पाने जाळून डास आणि किडे घालवत असत. याशिवाय कडुलिंबाचे तेलही वापरले जाते. घरात डासांचा प्रवेश रोखायचा असेल तर दारात किंवा बाल्कनीत कडुलिंबाचे रोप लावा. घरात जागेची अडचण असेल तर कुंडीत लावू शकता.
तुळशी
तुळशी ही अशी वनस्पती आहे जी बहुतेक घरांमध्ये आढळते. घराच्या बाल्कनी किंवा मुख्य दरवाजा, खिडकीच्या आजूबाजूला ठेवल्यास ती जागा स्वच्छ होईल आणि डासांच्या प्रवेशावर नियंत्रण येईल. याच्या वासामुळे डासही घरापासून दूर राहतात.
रोझमेरी
तुम्हाला कोणत्याही रोपवाटिकेतून रोजमेरीचे रोप सहज मिळेल. या वनस्पतीमध्ये येणाऱ्या फुलांचा वास खूप तीव्र असतो. या वासाने डास पळून जातात. तुम्हाला हवे असल्यास त्याची फुले घरच्या घरी कीटकनाशक म्हणूनही वापरता येतात. त्यासाठी त्याची फुले काही तास पाण्यात भिजवून ठेवावीत, जेणेकरून फुलांचा वास आणि सार पाण्यात येईल. त्यानंतर पाणी शिंपडावे.
पावसाळ्यात झाडांची अशी घ्या काळजी
- दर 15 ते 20 दिवसांनी झाडांच्या कुंडीत शेण किंवा इतर खते घाला. झाडे निरोगी ठेवण्यासाठी शेण खताची आवश्यकता असते. त्यामुळे नेहमी कुंडीत शेण किंवा इतर खते घालावी.
- वेळोवेळी झाडांची तपासणी करत रहा. पिवळी झालेली आणि किड लागलेली पाने तात्काळ काढून टाका,अन्यथा झाडांना त्यातून आवश्यक पोषण मिळत नाही.
- किटकांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर करू शकता.
हेही पहा :
Edited By : Nikita Shinde