अनेकांना प्रवास करायला खूप आवडतं. रोजच्या धावपळीतून आणि कामाच्या दडपणातून विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत प्रवास हा एक सर्वांसाठीच एक सुखद अनुभव ठरू शकतो. प्रवासामुळे, नवनवीन स्थळांना भेटी दिल्यामुळे आपलं मन ताजेतवाने होते. परंतु हाच प्रवासाचा अनुभव कधीकधी आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतो, जेव्हा आपला प्रवासखर्च हा गरजेपेक्षा जास्त होतो. या प्रवासासाठी लागणारा खर्च सहजरित्या उचलणे प्रत्येकासाठी सोपे नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की यासाठी प्रवासच करु नये. अनेकदा हवापालटासाठी , आपल्या मन: शांतीसाठी प्रवास करणे देखील खूप महत्वाचे आहे.
परंतु याकरता तितका पैसा उभा राहीपर्यंत थांबणेही योग्य नाही. अशा परिस्थितीत, काही स्मार्ट ट्रॅव्हल टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा प्रवास स्वस्त आणि सोपा करू शकता.
आगाऊ बुकिंग करा :
तात्काळ किंवा उशिरा बुकिंगसाठी अधिक खर्च येतो. त्याच वेळी, आगाऊ बुकिंग करून, आपण कमी किंमतीत आपल्या आवडीची सीट मिळवू शकतो. त्यामुळे 3 महिने आधीच आगाऊ तिकीट बुक करा आणि पैसे वाचवा.
ऑफ सीझन ट्रॅव्हल करा :
मार्च, एप्रिल, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांत विशेष सुट्टी नसल्यामुळे बहुतांश पर्यटन स्थळांवर गर्दी होत नाही. कोणत्याही पर्यटन स्थळाचा स्वतःचा एक ऑफ सीझन असतो. त्यानुसार निर्णय घ्या आणि ऑफ सीझन बुक करा कारण या सीझनमध्ये तिकिटांची मागणी कमी असते. त्यामुळे ती स्वस्त दरात उपलब्ध असतात आणि हॉटेल व खोल्याही स्वस्त दरात उपलब्ध असतात.
स्थानिक वाहतूक पर्याय निवडा :
सर्वत्र फ्लाइट किंवा कॅब बुक करण्याऐवजी, स्थानिक वाहतूक वापरा कारण ते स्वस्त उपलब्ध होऊ शकतात. जिथे शक्य असेल तिथे पायी चालत जा. यामुळे तुम्हाला अनेक नव्या जागा कळतील आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटीही देता येतील.
स्थानिक पदार्थ खा :
तुम्ही कुठेही गेलात तर तिथला सगळ्यात मोठा खर्च खाण्यावर होतो. अशा परिस्थितीत, मोठ्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाण्याऐवजी, स्थानिक बाजारपेठेला भेट द्या आणि तिथले लोकल पदार्थ खाण्यावर भर द्या. तिथे तुम्हाला स्वस्त दरात चांगले अन्न मिळू शकेल. महागडे रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क आणि विविध कर लादून तेच पदार्थ महाग किंमतीला मिळतात, म्हणून अशा प्रकारे अन्नावर खर्च होणारे पैसे वाचवा.
स्मार्ट पॅकिंग करा :
जादा सामानासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. म्हणून, एक हलकी बॅकपॅक हुशारीने ठेवा, जेणेकरून विशिष्ट वजन मर्यादा ओलांडली जाणार नाही. डिजिटल लगेज स्केल देखील बाजारात उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या सामानाचे वजन मोजू शकता आणि त्यानुसार पॅकिंग करू शकता.
औषधे़ घेतल्याची खात्री करा :
घरापासून दूर वेगळ्या वातावरणाच्या परिस्थितीत असताना आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत औषध आणि उपचाराच्या नावाखाली तिथले स्थानिक लोक तुमच्या भोळ्या समजुतीचा फायदा घेऊ शकतात. आणि तुम्हाला लुबाडू शकतात. त्यामुळे, तुमची प्राथमिक औषधे निश्चितपणे पॅक करा, जेणेकरून किरकोळ समस्या असेल तर तुम्ही स्वतः त्यावर उपचार घेऊ शकाल.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांच्या संगोपनाचा नवा ट्रेंड हॉरिझोन्टल पॅरेंटिंग
Edited By – Tanvi Gundaye