हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे अधिक सकारात्मक ऊर्जा असते. तुळस केवळ पूजनीयच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे. तुळशीला आयुर्वेदातही महत्त्वपूर्ण मानले जाते.
तुळशीचे औषधी गुणधर्म
- तापामध्ये फायदेशीर
मलेरिया आणि डेंग्यू तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळस गुणकारी आहे. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात साखर, वेलची पावडर आणि दूध याबरोबर तुळशीची पाने टाकून ते पाणी उकळून घ्यावे. हे पाणी ताप आलेल्या व्यक्तीला तीन-तीन तासाने द्यावे यामुळे ताप उतरण्यास मदत होते.
- सर्दी कमी होण्यास उपयोगी
वातावरणामध्ये बदल होताच सर्दी-खोकला अनेकांना होतो. अनेकजण याकरता डॉक्टरांकडे जाणं टाळतात. अशावेळी तुळशीची ताजी पाने धुवून चावून खावी. अथवा वाळवलेल्या तुळशीच्या पानांचा चहा करुन पिल्यास सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर घसा खवखवल्यास तुळशीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो.
- वेदनेवर फायदेशीर
मुंगी किंवा डास चावल्यास त्या जागेवर वेदना होतात. अशावेळी तुळशीची पाने त्या ठिकाणी चोळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
- मळमळ होत असल्यास उपयोगी
उलट्यांचा त्रास होत असल्यास तुळशीच्या पानांचा रस, आल्याचा रस आणि मध यांचे मिश्रण करुन तो काढा प्यायल्यास उलट्या कमी होतात.
- वजन कमी करण्यास फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी ताजे दही आणि तुळशीची पाने यांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- तोंडातील दुर्गंधी कमी होते
वाळवलेल्या तुळशीच्या पानांची पावडर आणि मोहरीचे तेल यांचे एकत्र मिश्रण करुन दाताला मसाज केल्यास दात किडण्यापासून देखील वाचतात. त्याचबरोबर तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तुळशी पाने खाल्यास तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या कमी होते.