घरलाईफस्टाईलअनोखा मैत्रीबंध

अनोखा मैत्रीबंध

Subscribe

मैत्रीचे बंध कुठे आणि कसे बांधले जातील याचे नित असे काही नियम नाहीत. मैत्रीच्या बंधात बंदिस्त व्हायला वयाचे बंधनही नसते.

मैत्री ही कार्यालयीन सहकार्यांशी होते, शेजार्यांशी होते, शाळकरी, कॉलेजातील मित्रांशी होते, रोजच्या प्रवासातील सहप्रवाशांशीही होते. आम्हा वृत्तपत्रलेखकांतही असाच मैत्रीबंध तयार झाला. तसं पाहायला गेलं तर वृत्तपत्रलेखकांची गणना बर्याच वेळा पदरमोड करुन लष्कराच्या भाकर्या मोजणार्यात केली जाते. परंतु वृत्तपत्रलेखक हे खर्या अर्थाने समाजमनाचा आरसा असतात. आपल्या लेखणीद्वारे समस्या मांडतानाच त्यांचे निराकरण करण्याचे उपायही सुचवत असतात. आम्ही सर्वजणही तसेच. अगदी कॉलेजयुवक ते निवृत्त अशा विविध वयोगटातील एकत्र आलेलो आम्ही ’वृत्तपत्रलेखक’ या समान दुव्यामुळे मैत्रीबंधात बांधले गेलो आहोत.

साधारण दोन वर्षापूर्वी एका वृत्तपत्रलेखक मेळाव्यात आमची तोंडओळख झाली. माझ्या एका पत्रकार मित्राने पुढाकार घेऊन आम्हा सर्वांचे संपर्क क्रमांक मिळवून व्हॉट्सअपवर ’वृत्तपत्रलेखक’ समूह तयार केला आणि त्या समूहाच्या माध्यमातून परिचय वाढत गेला. अधूनमधून काही कार्यक्रमांच्या निमित्ताने समूहातील काहीजणांच्या गाठीभेटी होत होत्या. परंतु सर्वजण एकत्र भेटण्याचा योग कधी आला नव्हता.

- Advertisement -

मग बनवलेल्या त्याच ग्रूपमधील एकाने सहलीचा विषय काढला. कल्पना सर्वांनाच आवडली. सहलीच्या निमित्याने आम्ही सर्वजन एकत्र भेटणार होतो. समूहातील उत्साही मित्रमंडळीकडून सोयिस्कर असे ठिकाण आणि तारीख यांचा अंदाज घेतला. परंतु प्रत्येकाच्या वैयक्तिक कारणांमुळे सहलीसाठी एकत्र येणे जमत नव्हते. शेवटी सहलीचा बेत रद्द करुन एका संध्याकाळी भेटण्याचा बेत सर्वानुमते आखला गेला आणि २०१८ मार्च महिन्याच्या ३० तारखेच्या संध्याकाळी तो बेत तडीस नेला.

आमच्या या ग्रुपमध्ये सर्व वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. कुणी मिश्किल स्वभावाचे तर ,कुणी सामाजीक बांधीलकी जोपासणारे, कुणी साहीत्य क्षेत्रात भरारी मारणारे, तर कुणी फोटोग्राफीच्या छंदातुन मोहक दृष्य टिपणारे, कुणी खूप वर्षापासून जॉबमध्ये स्थिरावलेले तर कुणी एकदम नवखेच जॉबला जॉईन झालेले होतो. मात्र सरवांनाच ठरलेल्या दिवशी एकत्र भेटणे शक्य नव्हते. फक्त १० जणांनाच भेटणे शक्य होते.

- Advertisement -

ठरल्याप्रमाणे आम्ही एका पार्कमध्ये भेटलो. त्या पार्कवरील हिरवळीवर मस्तपैकी गोलाकार भारतीय बैठक मारुन आम्ही बसलो. येतांना अनेकांनी काहीना काही खायचे पदार्थ आणले होते. कुणी नाश्ता तर कुणी पेय पदार्थ आणले होते. एका मित्राने सर्वांसाठी खास आणलेल्या शीतपेयाने तृष्णा भागवली. दुसर्‍या मित्राने आणलेले समोसे आणि प्लम केक खाऊन पोटपूजा केल्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय करुन दिला. या ओळखपरेडमधून प्रत्येकाचे वेगवेगळे पैलू सर्वांना ज्ञात झाले. वृत्तपत्रलेखन क्षेत्रातील सुरुवात व अनुभव प्रत्येकाने कथन केला. आमच्या एका खास मित्राने तर प्रत्येकाची नेमकी ओळख दर्शविणार्या चारोळ्या नर्मविनोदी शैलीत सादर केल्या.

या चारोळ्यांनी कॉलेजजीवनातील फिशपाँडची आठवण करुन दिली. विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन आवडीने करण्यात हातखंडा असणार्‍या एका मित्राने प्रत्येकाला गणपतीची सुंदर मूर्ती स्मरणभेट देऊन सुखद धक्का दिला. त्यामुळे आमचा मेळावा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला.

गप्पा भरात आल्या असतानाच वेळेचे भान राखत गप्पांचा कार्यक्रम आटोपता घेऊन उदरभरणासाठी आमची पावले सोमरच असलेल्या खानावळीकडे वळली. भोजनानंतर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणार्‍या मित्राचे सर्वांनीच अगत्यपूर्वक आभार मानले. प्रत्यक्ष भेटीमुळे मैत्रीबंधाची वीण अधिकच घट्ट झाली. यानंतरही वारंवार भेटत राहून ही वीण उसवणार नाही अशी हमी देऊन आम्ही एकमेकांना निरोप दिला आणि एका वेगळ्याच अनुभूतीत घरी परतलो. ही भेट कायम स्मरणात राहणार हे नक्की.

-श्री. दीपक गुंडये, वरळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -