व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस हा प्रेमी युगुलांसाठी खास असतो. प्रेमाची नवीन सुरूवात करणाऱ्यांसाठी ही एक विशेष संधी असते. थोडक्यात विवाहित जोडप्यांसाठी आणि प्रेमींसाठी त्यांच्या जोडीदारांसोबतचे नाते साजरे करण्याचा हा सण देखील आहे. दरवर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. प्रेमी युगुलांसाठी हा एक खास आठवडा आहे, ज्यामध्ये ते एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे. जर तुम्हालाही तुमच्या खास व्यक्तीला या दिवसांदरम्यान विश करायचे असेल, त्यांना भेटवस्तू द्यायची असेल तर आजच्या या लेखातून जाणून घेऊयात प्रेमाच्या आठवड्याबद्दल.
7 फेब्रुवारी (शुक्रवार) रोझ डे
व्हॅलेंटाइन वीकमधील पहिला दिवस म्हणून गुलाब दिवस अर्थात रोझ डे म्हणून साजरा केला जातो. गुलाब दिन म्हणजे गुलाबाशी संबंधित दिवस. खरं तर, फुले भावना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग असतात. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.
8 फेब्रुवारी (शनिवार) प्रपोज डे
प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. प्रपोज डे तुम्हाला तुमच्या क्रश किंवा पार्टनरला तुमचे प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना लग्नासाठी किंवा खास नात्यासाठी प्रपोज करतात.
9 फेब्रुवारी (रविवार) चॉकलेट डे
प्रपोज डे नंतर चॉकलेट डे साजरा केला जातो. चॉकलेट हे नात्यांमध्ये गोडवा आणण्याचे प्रतीक मानले जाते. हृदयाच्या आरोग्यासाठीही चॉकलेट फायदेशीर मानले जाते. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट देऊन प्रेमात गोडवा वाढवण्याची परंपरा आहे.
10 फेब्रुवारी (सोमवार) टेडी डे
जेव्हा लोक एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांच्यासाठी त्यांचे प्रियकर, प्रेयसी अनेक नाती निभावत असतात. असं म्हणतात की प्रेम हे अल्लड असतं, लहान मुलांसारखं निरागस असतं. याचेच प्रतीक म्हणून व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगुल एकमेकांना टेडी बेअर भेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात.
11 फेब्रुवारी (मंगळवार) प्रॉमिस डे
या दिवशी जोडपे एकमेकांना प्रेम करण्याचे, एकमेकांशी प्रामाणिक राहण्याचे आणि एकत्र राहण्याचे वचन देतात. विश्वासाच्या माध्यमातून प्रत्येक नाते मजबूत करण्यासाठी शपथा आणि आश्वासने वापरली जातात. प्रॉमिस डे निमित्त, तुम्ही तुमच्या क्रशला किंवा जोडीदाराला नेहमी त्यांच्यावर प्रेम करण्याचे, त्यांना पाठिंबा देण्याचे आणि आनंद वाटण्याचे वचन देऊ शकता.
12 फेब्रुवारी (बुधवार) हग डे
‘प्रेमाची मिठी’ खरोखरच जादूसारखी असते. फक्त एखाद्याला मिठी मारल्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. दिवसभराचा सर्व थकवा आणि ताण निघून जातो. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर मिठी मारून तुम्ही त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू शकता. प्रेम व्यक्त करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो. हग डे ला मिठी मारल्याने प्रेम आणि आपलेपणाची भावना निर्माण होते.
13 फेब्रुवारी (गुरुवार) किस डे
कोणत्याही शब्दांशिवाय किंवा भाषेशिवाय प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्पर्श. आईने आपल्या मुलासाठी केलेल्या चुंबनासारखे. प्रेमी युगुलांसाठीही हा दिवस खूप खास असतो. व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडमधील चुंबन त्यांच्या नात्यात प्रणय आणि भावनिक संबंध वाढवू शकते.
14 फेब्रुवारी (शुक्रवार) व्हॅलेंटाईन डे
हा प्रेमाचा सर्वात खास दिवस आहे, या दिवशी लोक डेटवर जातात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्या जोडीदारांना खास वाटण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतात.
हेही वाचा : Valentine Day Gift Ideas : व्हॅलेंटाइन डेनिमित्त पार्टनरला द्या हे खास गिफ्ट
Edited By – Tanvi Gundaye