खवय्यांची स्टार्टरसाठी पहिली पसंत, विरारचे पोहा भुजींग

एकदा या भुजींगची चव चाखणार्‍या खवय्याच्या जिभेवर सतत ही चव रेंगाळत राहते. त्याला पुन्हा-पुन्हा भुजींग खावेसे वाटत राहते.भुजींगची ही चव,ख्याती अमेरिका आणि दुबईतही पोहोचली आहे.

Bhujing Center

भुजींग,म्हणजे भाजलेले.असेच भाजलेले चिकन आगाशी भुजींग या नावाने गेल्या 8 दशकांपासून अमेरिका, दुबई अशा परदेशातही दरवळले आहे.कोळशाच्या भट्टीवर भाजलेले चिकन,त्यात बटाट्याचे भाजलेले गोल काप आणि वरून भुरभुरलेले कच्चे पोहे आणि घरगुती मसाला अशी या सुप्रसिद्ध भुजींगची सुटसुटीत रेसिपी असलेले पोहा भुजींग ही खवय्यांची स्टार्टर म्हणून पहिली पसंती ठरली आहे.

भुजींगची रेसिपी कशी तयार झाली,त्याची कहाणीही अजब आहे. आगाशीचे बाबु हरी गावड मुंबईत मीलमध्ये कामाला होते.त्यांचा आगाशीला ताडीचा व्यवसाय होता.मीलमधील त्यांचे सहकारी सुट्टीच्या दिवशी ताडी प्यायला यायचे.त्यांना चाखणा म्हणून देण्यासाठी बाबुतात्यांनी शेतातच चिकन-बटाटी भाजून भुजींग बनवायला सुरवात केली. तिथूनच वर्ल्ड फेमस आगाशी भुजींगला सुरुवात झाली.

1940 साली या खाद्य पदार्थाला सुरुवात झाली. त्यानंतर ताडीचा व्यवसाय कमी होत गेला आणि भुजींगचा व्यवसाय वाढत गेला.आता गावड यांची तिसरी पिढी भुजींग तयार करून खवय्यांना पुरवत आहे.बाबुतात्यांचे पुत्र सुधाकर गावड आता हा व्यवसाय सांभाळत आहेत.गावड यांना मदत करण्यासाठी त्यांचे जीवलग मित्र महादेव निजाई जात होते. त्यांनाही भुजींग बनवता येवू लागले. त्यांनी गावड यांच्या सहमतीने उंबरगोठण येथे भुजींग सेंटर सुरू केले. गेली 23 वर्षे त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे.

गावड यांच्या भुजींगची रेसिपी माहित करून वसई तालुक्यात शेकडोने भुजींग सेंटर सुरु झाले.त्यांनी आगाशी भुजींग अशी नावेही दिली. मात्र,गावड यांच्या हाताची चव या भुजींगला नसल्यामुळे ती बंद पडली. गावड यांच्या भुजींगने चिकन पुरवणार्‍यांपासून भुजींग तयार करणार्‍यापर्यंत शेकडो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांचे शागीर्द असलेल्या निजाई यांच्या सेंटरमधून रविवार आणि लग्नसराई,पार्टी,हळद,गटारी,थर्टीफस्ट डिसेंबर, वाढदिवस अशा खास दिवशी दोनशे किलो भुजींगची विक्री होते. या दिवसांत तर दमछाक होईपर्यंत ते खवय्यांची हौस भागवत असतात.

विरारमध्ये राहणार्‍या व्यक्तीला गाठून त्याच्याकडून मुंबईकर भुजींग मागवून आपल्या जिभेचे चोचले पुरवत असतात.तर अनेकदा आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी या भुजींगचा वापर केला जातो.एकदा या भुजींगची चव चाखणार्‍या खवय्याच्या जिभेवर सतत ही चव रेंगाळत राहते. त्याला पुन्हा-पुन्हा भुजींग खावेसे वाटत राहते.या भुजींगचा दरवळ इतका असतो की,घेवून जाणार्‍या वाटेवरील प्रत्येकाच्या नाकात शिरतो. भुजींगची ही चव,ख्याती अमेरिका आणि दुबईतही पोहोचली आहे.

वसई तालुक्यातील हजारो नागरिक दुबईला कार्यरत आहेत.सुट्टीत आल्यावर भुजींगचा आस्वाद त्यांच्याकडून वारंवार घेतला जातो.जाताना पाच किलो भुजींग ते सोबत घेवून जातात.त्यांना मसाला विरहीत भुजींग दिले जाते.मसाला वेगळा दिला जातो.दुबईला गेल्यावर भुजींग फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि आवश्यकतेनुसार भुजींग मसाला टाकून शिजवले जाते.त्याबाबतची माहिती त्यांना दिली जात असल्याचे महादेव निजाईंचे पुत्र अमर यांनी सांगितले.उंबरगोठण येथील भुजींग सेंटरचा कारभार अमर निजाई सांभाळत आहेत.

स्वतःच्या अशा या धंद्यात पूर्ण समाधानी असल्याचे सांगतानाच त्यांनी भुजींगचे मुळ जन्मदाते हरीतात्या, सुधाकर गावड आणि वडील महादेव यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.अशा या आगाशी भुजींगने लाखो खवय्यांचे चोचले पुरवतानाच अनेकांना रोजगार,व्यवसाय मिळवून दिला आहे.अशा भुजींगची चव तुम्ही चाखली नसेल तर विरार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून रिक्षा,बसने आगाशी किंवा उंबरगोठण गाठायचे. फोनवरून भुजींगची ऑर्डर देता येते.