घरलाईफस्टाईलवायनाडला चला!

वायनाडला चला!

Subscribe

विलक्षण सुंदर असा हा प्रदेश आपल्या उप-उष्णकटिबंधीय गवताची पठारे, रम्य हिल स्टेशन, विस्तीर्ण मसाल्याची लागवड, घनदाट जंगले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. वन्य प्रदेश, इतिहास आणि संस्कृती यांचे मीलन असे वायनाड भव्य दक्खन पठाराच्या दक्षिण टोकाला वसले आहे.

आपल्या देशात पर्यटनावर चालणारी मोजकी राज्ये आहेत. त्यात गोव्याचा क्रमांक वरचा लागतो. त्या खालोखाल जम्मू-काश्मीर आणि केरळ राज्यांचा समावेश होतो. केरळ हे निसर्गरम्य ठिकाण आहेच. पण निवांत आणि खर्‍या अर्थाने पर्यटनाचा आनंद देणारे ठिकाण आहे. यात वायनाडचा समावेश आवर्जून केला जातो. पश्चिम घाटावर पसरलेले जैव-विविधतेने भरलेले २१३२ चौ.किमीवर पसरलेले हे क्षेत्र हे केरळच्या वायनाडचेे एक रम्य स्थळ आहे. ज्याने आपला निसर्ग जपून ठेवला आहे. या भूमीतील कड्याकपार्‍यांमध्ये लपले आहेत असे सर्वात प्राचीन आदिवासी, नागरी वार्‍यांपासून अनभिज्ञ असलेले. केरळमधील पहिला इतिहासपूर्व लेख एडक्कलच्या पायथ्याशी आणि अंबुकुथिमलाच्या भोवतीचा पुरावा संस्कृतीची मूळे मध्यपाषाणात नेतात. विलक्षण सुंदर असा हा प्रदेश आपल्या उप-उष्णकटिबंधीय गवताची पठारे, रम्य हिल स्टेशन, विस्तीर्ण मसाल्याची लागवड, घनदाट जंगले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. वन्य प्रदेश, इतिहास आणि संस्कृती यांचे मीलन असे वायनाड भव्य दक्खन पठाराच्या दक्षिण टोकाला वसले आहे.

कसे जायचे वायनाडला?
जवळचे विमानतळ: कोझिकोड
जवळचे रेल्वे स्थानक: कोझिकोड

- Advertisement -

जिल्ह्यातील मुख्य गावे आणि जवळच्या रेल्वे स्थानकापासूनचे अंतर:
कलपेट्टा: कोझिकोड पासून 72 किमी
मानंतवाडी: थलसेरी पासून 80 किमी आणि कोझिकोड पासून 106 किमी
सुल्तान बाथरी: कोझिकोड पासून 97 किमी
वैत्तिरी: कोझिकोड पासून 60 किमी
रस्ता: कोझिकोड, कन्नूर, ऊटी (कलपेट्टा पासून 175 किमी) आणि मैसूर (कलपेट्टा पासून 140 किमी) यांच्याशी रस्त्याने उत्तम प्रकारे जोडलेला आहे.

चेंब्रा शिखर
वायनाडच्या दक्षिण भागातील मेप्पाडी जवळ साधारण 2100 मीटर उंचावर उन्नत असे चेंब्रा शिखर आहे. हे त्या भागातील सर्वात ऊत्तुंग असे गिरीशिखर असून या शिखारावर चढण्यासाठी आपले शारीरिक कौशल्य पणाला लावावे लागते. चेंब्रा शिखरावर चढणे हा खरोखरच एक चित्तथरारक अनुभव असतो. जसजसे आपण या शिखराच्या एकेका थांब्यावर पोहोचतो, तसे वायनाडचे विस्तृत सौंदर्य पाहावयास मिळते. आणि हे दृष्य शिखरावर पोहोचताच अधिक व्यापक होते. या शिखरावर चढणे आणि परत खाली येणे यासाठी एक दिवस लागतो. ज्यांना शिखरावर शिबिर करून रहावयाचे असेल त्यांना तर हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.
ज्यांना येथे शिबिर करून थांबायचे असेल त्यांच्यासाठी वायनाड येथील कलपेट्टा येथून ‘जिल्हा पर्यटन विकास परिषद’अर्थात डिस्ट्रिक्ट टूरिझम प्रमोशन काउन्सिल यांची संमती घ्यावी लागते.

- Advertisement -

नीलिमला
नीलिमला हे वायनाडमधील दक्षिण-पूर्व भागात असून कलपेट्टा आणि सुलतान बाथरी या दोन्ही ठिकाणांहून तेथे जाता येते. ट्रेकिंगसाठी विविध मार्गांचे पर्याय उपलब्ध करुन देणारे नीलिमला हे ट्रेकरर्स डिलाईट अर्थात ट्रेकिंग करणार्‍यांसाठीचे आनंदाचे ठिकाण ठरते. नीलिमलाच्या शिखरावरील दृष्य हे अत्यंत विहंगम आणि लुभावणारे असून जवळच असलेला मीनमुट्टी धबधबा आणि त्याच्या आसपासचा दरीचे खोल दृश्य इथे पाहायला मिळते.

मीनमुट्टी
नीलिमलापासून जवळच अत्यंत भव्य असा मीनमुट्टी धबधबा आहे. ऊटी आणि वायनाड यांना जोडणार्‍या मुख्य रस्त्यावरून पुढे 2 किमी ट्रेकिंग मार्गावरून येथे पोहोचता येते. वायनाड जिल्ह्यातील हा सर्वात मोठा धबधबा आहे. साधारण 300 मीटर उंचीवरून तीन अवस्थांमध्ये पाणी खाली कोसळणारा हा धबधबा खरोखर आपल्या उत्सुकतेत भर टाकतो.

छेतालयम
वायनाडमधील पर्यटकांना आकर्षित करणारा आणखी एक धबधबा म्हणजे छेतालयम धबधबा. वायनाडच्या उत्तर भागातील सुलतान बाथरीच्या अगदी जवळच हा धबधबा आहे. मीनेमुट्टीच्या तुलनेत हा धबधबा छोटा आहे. परंतु हा धबधबा आणि त्याच्या लगतचा परिसर हा ट्रेकिंग करणार्‍यांसाठी आणि पक्षी निरिक्षकांसाठी आदर्श आहे.

पक्षीपाथालम
ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या अत्यंत घनदाट अशा जंगलात साधारण 1700 मीटर पेक्षा अधिक उंचावर पक्षीपाथालम वसलेले आहे. या भागात प्रामुख्याने मोठे खडक आढळतात. यापैकी काही खरोखरच महाकाय आहेत. येथील खोलवर असणार्‍या गुहा या मोठ्या प्रमाणात असलेले विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या विशिष्ट प्रजाती यांचे आश्रयस्थान आहे. पक्षीपाथालम हे मानंतवाडीच्या जवळ असून तीरूनेल्लीपासून सुरू होणार्‍या जंगलातून 7 किमी अंतर ट्रेकिंगद्वारे पार केल्यानंतर या भागात पोहोचता येते. पक्षीपाथालम येथे पोहोचण्यासाठी ( DFO- उत्तर वायनाड) घन -जंगल अधिकारी, उत्तर वायनाड यांची अनुमती घ्यावी लागते.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -