महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येणे ही एक शारीरिक प्रकिया आहे. प्रत्येक स्त्रीला एका विशिष्ट वयानंतर यातून जावे लागते. या काळात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की, रक्तस्त्राव, पोटदुखी, मूड स्विंग्स. याशिवाय अनेक महिलांना मासिक पाळीच्या 4 ते 5 दिवसात सतत चक्कर येण्याची समस्या जाणवते. तुमच्याही बाबतीत असं घडत का? मग ही बातमी शेवटपर्यत नक्की वाचावी. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत सतत चक्कर का येते याची काही सामान्य कारणे सांगत आहोत.
मासिक पाळीत चक्कर येण्याची कारणे –
- डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळीदरम्यान महिलांना रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे शरीरात रक्त कमी होते. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि त्यात जर महिलांना अशक्तपणाची समस्या असेल तर चक्कर येण्याची शक्यता अधिक असते.
- याशिवाय आणखी एक कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान, शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी बदलते, ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो आणि चक्कर येण्याची शक्यता अधिक असते.
- काही महिला अशा असतात ज्या मासिक पाळीच्या काळात खाणे-पिणे बंद करतात. यामुळे रक्तदाबाची समस्या उद्भवते. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. रक्तस्त्राव झाल्यामुळे डिहाड्रेशन होते. शरीरात डिहायड्रेशन झाल्यामुळे पाण्याअभावीही अशक्तपणा आणि चक्कर येते.
चक्कर न येण्यासाठी काय कराल?
- लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे. जसे की, डाळिंब, बीट, सफरचंद, गूळ.
- पुरेसे पाणी प्यावे.
- आहारात हर्बल टी, नारळपाणी तुम्ही पिऊ शकता.
- कॅफिनयुक्त आहार टाळावा. कॅफिनयुक्त आहारामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि तुम्हाला चक्कर येऊ शकते.
हेही पाहा –