महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाआधी केला जातो. आता अनेकदा लग्नाआधी नवरा नवरी दोघांनाही मित्रमंडळी, आप्तेष्टांकडून केळवणाचे आमंत्रण दिले जाते. काही ठिकाणी तर वर- वधूच्या आई वडिलांना सुद्धा आग्रहाने बोलावले जाते. या केळवणासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. केळवणात वधू वराच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खायला घालतात. प्रेमाचं प्रतिक म्हणून वधूवरांना गिफ्ट दिलं जातं आणि भरपूर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. केळवणात बऱ्यातदा साडी, कपडे, दागदागिने, मौल्यवान वस्तू, रूखवतातील वस्तू, संसारासाठी उपयुक्त वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात.
केळवण का करतात ?
मुलगी एकदा सासरी गेली की तिचे आपल्या माहेरच्या कुटुंबाकडे येणे जाणे भेटीगाठी खूपच कमी होऊन जाते . त्यासाठी मुलगी सासरी जाण्या अगोदर नातेवाईक, मित्र मैत्रिणी तिला व तिच्या कुटुंबाला जेवायला आमंत्रण देतात आणि छान असा पाहुणचार करतात. यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात गप्पा गोष्टी होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लग्नाच्या गडबडीतून लग्न घरातील लोकांना थोडा अराम मिळतो.
गडगनेर असेही नाव
केळवणासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. 1832 साली प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थ-कॅन्डी कोशात हा शब्द आहे. त्याअर्थी ही प्रथा फार जुनी असावी. केळवण या शब्दाचे विविध अर्थ असून तर देशस्था मधे गडगनेर असे म्हटले जाते. कानडीमध्ये गडि(ड)गे म्हणजे घागर, आणि नीर म्हणजे पाणी. यावरून मराठीत आलेला शब्द गडगनेर हा कार्यक्रम म्हणजे वधू किंवा वराला त्या निमित्ताने घराबाहेर काढून शेजारी, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यासोबत थट्टामस्करी केली जाते. याला मराठवाड्यात वलवत असेही संबोधले जाते. भोजनाच्या निमित्ताने उत्सवमुर्तीचे लाड केले जातात.
आजच्या काळात बदलले स्वरूप
आजही विविध भागात ही परंपरा सुरू आहे. नव्या पिढीत तिचे स्वरूप बदलले आहे. काही जण तर पार्टीसारखे साजरे करतात. अनेकजण तर नॉन व्हेजचा ही बेत आखतात. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे या प्रथेचे स्वरूप बदलत आहे. तसेच हॉटेलमध्येही निमंत्रण देऊन केळवण साजरी करतात.