आनंदी गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यांनाच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचे श्रेय जाते. मात्र, आनंदी गोपाळ जोशी यांचा डॉक्टर होण्याचा प्रवास सोपा नव्हता. ज्या काळात महिलांना घराचा उंबरठा ओलांडणे अशक्य होते अशा परिस्थितीत वैद्यकिय क्षेत्रात पाऊल टाकत त्यांनी परदेशात शिक्षण घेतले होते. जाणून घेऊयात, आजच्या तिची गोष्टमध्ये 19 व्या शतकात संपूर्ण समाजाचा विरोध पत्करत अमेरिकेत जाऊन डॉक्टरची पदवी मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदी गोपाळराव जोशी यांचा खडतर प्रवास
आनंदी बाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आधीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या जेष्ठ कन्या होत्या. आनंदीबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पतीचे नाव गोपाळराव जोशी असे आहे. गोपाळराव जोशी हे आनंदीबाईंपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. गोपाळराव जोशी मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. गोपाळराव आणि यमुना (आधीचे नाव) यांचे लग्न झाल्यावर गोपाळरावांनी त्यांचे नाव आनंदीबाई असे ठेवले. लग्नानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. पण, वैद्यकिय सेवेअभावी आनंदीबाई यांना पोटच्या मुलाला गमवावे लागले. बाळ दगावल्याचा मोठा धक्का आनंदीबाई यांना बसला आणि त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
या घटनेनंतर गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाईंना डॉक्टर करण्यासाठी मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. गोपाळराव हे कल्याणच्या पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते. नंतर त्यांची बदली अलिबाग आणि नंतर कोलकत्ता येथे करण्यात आली. दोघेही कोलकत्याला आल्यावर आनंदीबाई संस्कृत आणि इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकल्या. गोपाळराव पुरोगामी विचाराचे होते. त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. गोपाळराव लोकहितवादी शतपत्रे वाचायचे. या वाचनानंतर प्रभावित होऊन त्यांनी आपल्या पत्नीला उच्च शिक्षण देण्याचे ठरविले.
वैद्यकिय शिक्षणाची सुरूवात –
गोपाळरावांनी अमेरिकेत काही ठिकाणी पत्रव्यवहार करुन आनंदीबाईंना डॉक्टर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, वैद्यकिय शिक्षण घ्यायचे असल्यास खिश्च्रन धर्म स्विकारण्याची अट त्यांना सांगण्यात आली. गोपाळराव जोशी हे कट्टर हिंदू धर्मीय होते. या अटीला न जुमानता पुढे गोपाळरावांनी चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये वयाच्या 19 वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिलव्हेनियामध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर आनंदीबाईंचे वैद्यकिय शिक्षण सुरू झाले. मेट्रिक परिक्षाही पास न झालेल्या आनंदीबाई शिक्षणासाठी कलकत्ता बंदरावरील बोटीतून अमेरिकेसाठी रवाना झाल्या. अमेरिकत पोहोचल्यावर नवीन वातावरणामुळे आनंदीबाईंची प्रकृती ढासळली. याचदरम्यान अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याची त्यांना प्रचंड मदत झाली. अमेरिकेत त्या त्यांच्या घरी राहत होत्या. मोठे कष्ट आणि जिद्दीमुळे आनंदीबाई यांना 1886 मध्ये एमडीची पदवी प्रदान करण्यात आली. अमेरिकेत एमडीच्या प्रबंधाचा त्यांचा विषयही भारतीय आर्य स्त्रीचे प्रसुतीशास्त्र हाच होता.
क्षयरोगाची लागण –
परदेशात शिक्षण घेऊन त्या भारतीय महिलांची सेवा करण्यासाठी मायदेशी परतल्या. पण, त्यांना येथे आल्यावर क्षयरोगाची लागण झाली होती. आजाराशी दोन हात करत असतानाच आनंदीबाईंनी 26 फेब्रुवारी 1887 रोजी या जगाचा निरोप घेतला.
हेही पाहा –