आपल्या देशात अनेक राजघराणे होऊन गेले आहेत. यापूर्वी अनेक राजघराण्यांनी देशात सत्ता गाजवल्याचे आपण पाहिले. जसजसा काळ बदलत गेला तसतसे राजघराण्यांचे वर्चस्व कमी होऊ लागले. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजही अनेक राजघराणे देशात अस्तित्वात आहेत आणि ही राजघराणे त्याच राजेशाही थाटात आपले आयुष्य जगत आहेत. त्यापैंकी एक राजघराणे म्हणजे बडोद्यातील गायकवाड राजपरिवार. समरजितसिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी अर्थात राधिकाराजे गायकवाड त्यांच्या परिवारासह आजही त्याच थाटात आयुष्य जगत आहेत. राजे समरजितसिंह गायकवाड यांच्या पत्नी राणी राधिकाराजे गायकवाड या केवळ महाराणी नसून त्यांचे कर्तृत्व हे तितकेच प्रेरणादायी आहे. आजच्या तिची गोष्टमध्ये जाणून घेऊयात देशातील सुंदर महाराण्यांपैकी एक असणाऱ्या बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांच्याविषयी,
राधिकाराजे गायकवाड यांचा जन्म –
देशातील शाही वारसा असलेला आणि जगातील सर्वात मोठा राजवाडा असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राणी राधिकाराजे गायकवाड राहतात. खरं तर, गायकवाड हे एकेकाळी बडोद्याचे शासक होते. सध्या समरजितसिंह गायकवाड हे याच कुटुंबाचे नेतृत्व करत आहेत. राधिकाही त्याच जिद्दीने हे सर्व सांभाळत आहेत. राणी राधिकाराजे यांचा जन्म 19 जुलै 1978 रोजी झाला आहे. त्या मुळच्या गुजरातच्या वाकांनेर येथील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून भारतीय इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
महाराणी राधिकाराजे यांचे कार्य –
महाराणी राधिकाराजे गायकवाड या केवळ बडोद्याच्या राजघराण्याचा भाग नाहीत तर त्यांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. त्या एक इतिहासकार, पत्रकार आणि समाजसेवक सुद्धा आहेत. त्यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. 2002 मध्ये राजे समरजितसिंग गायकवाड यांच्याशी विवाह करण्यापूर्वी राधिकाराजे गायकवाड यांनी पत्रकार म्हणून देखील काम केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या अधिक ओळखल्या जातात. याशिवाय त्या महिला आणि मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी विविध सामाजिक मोहिमांमध्ये भाग घेतात आणि बडोद्याच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी कार्य करतात. यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोर्ब्स मासिकामध्ये भारतीय राजवंशातील सर्वात सुंदर महिला म्हणून राधिकाराजे यांचे नाव घेण्यात आले आहे. यासह मिलियनेरे मासिकात त्यांना मॉडर्न महाराणी असे म्हणण्यात आले आहे.
लक्ष्मी विलास पॅलेसचा राजेशाही थाट
लक्ष्मी विलास पॅलेसचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, हा लक्ष्मी विलास पॅलेस जगातील सर्वात मोठा खासगी निवासस्थान म्हणून ओळखला जातो. लक्ष्मी विलास पॅलेस 30 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे, जो बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपट भव्य असल्याचे बोलले जाते. या पॅलेसमध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. याशिवाय एक विशाल गोल्फ कोर्स, शाही संग्रहालय सारखे डोळ्यांचे पारणे फिटेल असे भारतीय वास्तुकलेचे अनोखे नमुने तुम्हाला येथे जतन केलेले पाहायला मिळतील. असे म्हणतात की, 1890 मध्ये गायकवाड घराण्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बांधलेला हा राजवाडा आहे.
हेही पाहा –