असं म्हणतात की, महिलांना जगातील सर्व कठीण कामे येतील पण, महिलांमंडळींना ड्रायव्हिंग जमणे अशक्यच आहे. वर्षानुवर्ष महिलांबाबत बोलली जाणारी हीच धारणा मोडून काढत भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनण्याचा मान मिळविला आहे तो सातारच्या मराठमोठ्या लेकीने सुरेखा यादव यांनी. सुरेखा यादव यांना केवळ भारतीय रेल्वेतीलच नाही तर आशियातील पहिली महिला रेल्वे चालक असण्याचा मान मिळाला आहे. आजपर्यत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जाणून घेऊयात पुरुषप्रधान मानलं जाणाऱ्या क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या सुरेखा यादव यांची गोष्ट
जन्म –
सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी साताऱ्यात झाला. सुरेखा यांचे बालपण साताऱ्यात गेले आहे. सुरेखा यांचे वडील शेतकरी होते आणि एकूण पाच भावंडामध्ये सुरेखा सर्वात मोठ्या आहेत. सुरेखा यादव यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र भोसले आणि आईचे नाव सोनाबाई असे आहे.
शिक्षण –
सुरेखा यादव यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आणि नंतर साताऱ्यातील कराड येथील सरकारी पॉलिटेक्निमधून इलेक्ट्रिकल इंजिनीयरचा डिप्लोमा पूर्ण केला. रेल्वेसाठी असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरला. 1986 मध्ये त्या लेखी परिक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरल्या. मुलाखतीत निवड झाल्यानंतर सुरेखा सुरेखा यांची सहा महिन्यांसाठी कल्याण ट्रेनिंग स्कूलमध्ये सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मध्ये त्या सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या. मालगाडीचे सारथ्य सुरळीतपणे हाताळल्याने 2000 मध्ये मोटर वुमन पदावर बढती मिळाली. पश्चिम घाट रेल्वे मार्गावर ट्रेन चालवण्याची संधी त्यांना 2010 मध्ये मिळाली. त्यानंतर 2011मध्ये त्या एक्सप्रेस मेलच्या पायलट बनल्या. अशा प्रकारे 2011 मध्ये अथक प्रयत्नानंतर मध्य रेल्वेकडून आणि सुरेख यादव यांच्या कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे सुरेखा यादव या आशियातील पहिली महिला ड्रायव्हर झाल्या.
वैवाहिक आयुष्य –
सुरेखा यादव यांच्या पतीचे नाव शंकर यादव असे आहे. ते महाराष्ट्र पोलिस इन्स्पेक्टर आहेत. सुरेखा आणि शंकर यांना दोन मुले आहेत. कुटूंबाच्या पाठीब्यांशिवाय मी इथपर्यत पोहोचले नसते , असे त्या कायम सांगतात.
सुरेखा यादव यांचा प्रवास –
- सर्वप्रथम मध्ये रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरचालक म्हणून निवड
- 1989 – 1993 मालवाहू गाडीची सहाय्यक इंजिन ड्रायव्हरची नोकरी
- मार्च 1993 ते ऑगस्ट 1993 पर्यत इगतपुरी घाट इंजिनचे सहायक ड्रायव्हर
- सप्टेंबर 1993 ते एप्रिल 1994 मध्ये लोणावळा घाटात मेलला धक्का देणाऱ्या इंजिनचे सहायक ड्रायव्हर
- ऑगस्ट 1994 ते मार्च 1995पर्यंत मालगाडी इंजिन ड्रायव्हरची जबाबदारी
- 1998 मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविण्याचा मान
- 8 मार्च २०11मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली
सुरेखा यादव या त्यांच्या यशाचे श्रेय कुटूंबाला आणि भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना देतात. महिला केवळ चुल-मूलंच सांभाळू शकतात, पुरुषांप्रमाणे त्या कोणत्याही क्षेत्रात काम करू शकत नाही, असं म्हणणाऱ्या पुरुशप्रधान समाजाला सुरेखा यादव यांनी जोरदार चपराक दिली आहे.
हेही पाहा –