बदलत्या ऋतूमानानुसार, आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात होणाऱ्या बदलानुसार आजारांचा धोकाही वाढतो. जसजसे हवामान अधिक थंड होत जाते तसतसे माणसांबरोबरच पाळीव प्राण्यांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीच्या काळात पाळीव प्राण्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून ते निरोगी राहतील आणि त्यांच्या आरोग्यावर थंडीचा फारसा परिणाम होणार नाही.
पाळीव प्राण्यांचे घर :
थंड हवामानात आपल्या पाळीव प्राण्याच्या राहण्याची जागा उबदार आणि सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. जर ते बाहेर राहत असतील तर त्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आरामदायक, कोरडी आणि हवेशीर जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आत राहणाऱ्या प्राण्यांसाठी, त्यांच्या पलंगावर उबदारपणाची पुरेशी व्यवस्था असेल याचीही काळजी घेतली पाहिजे.
आहार आणि पोषण :
पाळीव प्राण्यांना त्यांचे शरीर उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते. या ऋतूत त्यांना हाय प्रोटीन्स असलेला आहार देणे गरजेचे आहे. त्यांच्या आहारात गरम सूप किंवा उकडलेले अन्न समाविष्ट करू शकता. तसेच, त्यांना स्वच्छ आणि ताजे पाणी नियमित मिळेल याचीही काळजी घ्यायला हवी.
व्यायाम आणि शारीरिक हालचाली :
जरी थंडीमुळे जनावरांना बाहेर नेणे कठीण जात असले तरी त्यांना सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी घरामध्येच खेळण्याची आणि व्यायाम करण्याची व्यवस्था करून द्या. बाहेर जाताना त्यांच्यासाठी उबदार कपड्यांचीही व्यवस्था तुम्ही करू शकता. जेणेकरून त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल.
त्वचा आणि आवरणाची काळजी :
थंडीत जनावरांची त्वचा कोरडी पडते, त्यामुळे त्यांच्या त्वचेची नियमित काळजी घेतली पाहिजे. कोमट पाण्याने आंघोळ करणे आणि चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर आहे. केसांमध्ये गाठ नसण्यासाठी त्यांच्या त्वचेला हळुवार कंगव्याच्या सहाय्याने विंचरायला हवे. थंड हवामानात, प्राण्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना नियमित लसीकरण करायला हवे आणि आरोग्य तपासणीसाठी पशुवैद्यकाकडे नेले पाहिजे.
हेही वाचा : Health Tips : स्ट्रेस दूर करण्यासाठी उपयुक्त योगासने
Edited By – Tanvi Gundaye