जेव्हा एखादी महिला रस्त्यावर गाडी चालवते, तेव्हा अनेकजण तिच्याकडे थोडं आश्चर्याने पाहतात. तिच्याकडे नाक मुरडूनही पाहिलं जातं. आजही ‘स्त्रिया वाईट ड्रायव्हर असतात’ असा विनोद केला जातो. आपण जरी एकविसाव्या शतकात जगत असलो तरी आपली विचारसरणी अजूनही मागासलेली आहे. एकेकाळी पुरुषाचे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या बाइकिंगला आता अनेक भारतीय स्त्रिया मोडीत काढताना दिसत आहेत. अशा अनेक महिला बायकर्स आहेत ज्या भारताच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीत वाढल्या आहेत परंतु त्या सर्वांमध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे त्या सर्वांचे बाइकवर असणारे प्रेम! आज आपण जाणून घेऊयात अशा काही महिला बाइक रायडर्सबद्दल ज्यांच्या बाइकिंगच्या आवडीने सर्व सामाजिक बंधनं तोडली.
1. डॉ. निहारिका यादव :
डॉ. निहारिका यादव या व्यवसायाने डेंटिस्ट आहेत आणि छंदाने सुपरबाइक रेसर आहेत, ज्यांना भारतातील सर्वात वेगवान महिला सुपरबाइकर्सपैकी एक समजले जाते. 2015 मध्ये KTM ओपन ट्रॅकमध्ये 97 पुरुष बाईकर्समध्ये त्यांनी 20 वा क्रमांक पटकावला होता. हरियाणातील गुडगाव येथे जन्मलेल्या निहारिकाला तिच्या हाय-स्पीड रेसिंगच्या आवडीसह तिच्या डेंटिस्टच्या व्यवसायात समतोल कसा साधायचा हे माहीत आहे. वीकेंडला, बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर ती तिची डुकाटी पानिगेल 899 बाइक चालवत जाते.
2. उर्वशी पाटोळे :
उर्वशी पाटोळे हिने फिरोदास शेख यांच्या सोबत 2011 मध्ये भारतातील पहिला आणि सर्वात मोठा सर्व-महिला मोटरसायकल क्लब ‘द बिकर्नी’ ची स्थापना केली. डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल असलेल्या उर्वशीने वयाच्या 14 व्या वर्षी मोटरसायकल चालवण्याचा सराव करण्यास सुरुवात केली आणि स्टंटिंग ॲक्टिव्हिटीही केल्या. वयाच्या 17 व्या वर्षी मनगटाला दुखापत झाल्यानंतर तिने स्टंटबाजी सोडली आणि ती अॅडव्हेंचर राइडकडे वळली.
3. आयेशा अमीन :
उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील आयेशा अमीन यांना बुरखा रायडर म्हणूनही ओळखले जाते. तिने हिजाब परिधान करून रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चालवून सर्व महिलांसमोर एक नवा आदर्श घालून दिला. 2015 मध्ये आयेशा हिजाब परिधान करून लखनऊमध्ये महिला बाइकर्स मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. बाइक चालवण्यापलीकडे, आयेशा एक डिजिटल मार्केटिंग तज्ञ आणि मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहे.
4. ऐश्वर्या पिसे :
ही भारतीय महिला बाइकर मूळची बेंगळुरूची आहे आणि मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. ऐश्वर्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी MTV च्या शोसाठी बाइक चालवायला सुरुवात केली जिथे तिने 243 दिवसात गुजरातपासून ते मेघालयपर्यंत बाइक चालवली. वयाच्या 21 व्या वर्षी, पिसेने TVS वन-मेकर रेस चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले आणि स्पेनमधील FIM बजाज विश्वचषक जिंकून मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय बनली.
5. शिरीन शेख :
पुण्यातील शिरीन शेख ही सिंगल मदर असली तरीदेखील तिने आपली बाइक चालवायची हौस हिरीरीने पूर्ण केली. तिने वयाच्या 14 व्या वर्षी Yamaha RX 100 चालवण्यास सुरुवात केली आणि आज ती Royal Enfield Thunderbird 350CC चालवते. शिरीन एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करते आणि अनेक बाइकिंग इव्हेंटमध्येही भाग घेते. एक आई आणि व्यावसायिक म्हणून तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिने सामाजिक रूढींना तोडून, बाइकिंगची आवड जोपासत अनेकांना प्रेरणा दिली आहे.
6. रोशनी मिसबाह :
रोशनी ही व्यवसायाने ऑटोमोबाईल उद्योजक आहे आणि द बाइकर्स वर्ल्ड इंडियाशी संबंधित आहे. कावासाकी निन्जा H2 चालवणाऱ्या हिजाब परिधान केलेल्या या महिला बाइकरने तिच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीसोबत बाइक चालवण्याची आवडही तितक्याच आनंदाने जोपासली आहे. रोशनीने जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथून शिक्षण घेतले आहे.
7. रोशनी शर्मा :
कन्याकुमारी ते काश्मीर असा एकट्याने बाइक प्रवास करणारी रोशनी शर्मा ही पहिली भारतीय महिला आहे. रोशनीने वयाच्या 16 व्या वर्षी बाइक चालवण्यास सुरुवात केली. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी कन्याकुमार ते काश्मीर अशी 11 राज्ये, खडतर रस्ते आणि पर्वत यावर एकटीने बाइक चालवण्याचा निर्णय घेतला.
8. डॉ. सारिका मेहता :
गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असलेल्या डॉ. सारिका मेहता या व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आणि आवडीने दुचाकीस्वार आहेत. त्यांनी ‘बाइकिंग क्वीन्स’ची स्थापना केली आहे, ज्याचा उद्देश महिलांना सक्षम बनवण्याचा आहे. सामाजिक मोहिमेसाठी 21 देश आणि 2 खंडांमध्ये 21,000 किमी प्रवास करणारी पहिली बाइकर होण्याचा मान डॉ. मेहता यांना मिळाला आहे.
हेही वाचा : Chand Bibi : मुघलांना चॅलेंज देणारी महाराणी चाँद बिबी
Edited By – Tanvi Gundaye