भारतीय विवाहित महिलेला तिच्या राहण्याच्या हक्कापासून ते तिच्याशी बांधिलकी असलेल्या नात्यापर्यंत स्त्रीला सहा मूलभूत अधिकार असतात. परंतु अनेक महिलांना याविषयी अजिबात माहित नसते.
1 स्त्रीधनाचा अधिकार :
स्त्रीचा तिच्या सगळ्या दागदागिन्यांवर, लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंवर आणि पैशावर अधिकार असतो. या सगळ्या गोष्टीचा मालकीहक्क तिला मिळालेला असतो. अगदी ही सगळी संपत्ती तिच्या नवऱ्याच्या किंवा सासूच्या ताब्यात असली तरी त्यावर हक्क असतो तो स्त्रीचाच. स्त्रीधनावर सर्वोच्च न्यायालयाने महिलांना पूर्ण अधिकार दिले आहेत. घटस्फोटानंतरही स्त्रिया हक्क गमावत नाहीत असा नियम आहे.
2 घरावरील हक्क :
पती रहात असलेल्या सासरच्या घरावर पत्नीचा देखील हक्क असतो. अगदी ते वडिलोपार्जित घर असले किंवा एकत्रित कुटुंबाचे असले तरी त्याठिकाणी राहण्याचा तिला पूर्ण हक्क असतो. सासरचे घर भाड्याचे असो किंवा पतीने स्वतःने घेतलेले किंवा बांधलेले असले तरी त्यामध्ये राहण्याचा पत्नीला पूर्ण हक्क असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीला, मग ती विवाहित असो किंवा अविवाहित, तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर तिच्या पुरुष भावंडांप्रमाणे समान हक्क आहेत.
3 नात्यातील बांधिलकीचा अधिकार :
पती-पत्नीने एकमेकांशी निष्ठेने व नात्यातील बांधिलकी जपून राहिले पाहिजे, असे मानले जाते. पतीने पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट घेतल्याखेरीज तो दुसऱ्या स्त्रीशी विवाह करू शकत नाही किंवा तिच्याशी संबंध ठेवू शकत नाही. पहिली पत्नी असताना त्याने दुसच्या स्त्रीशी संबंध ठेवला तर त्याच्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवता येतो. या कारणावरून पत्नी त्याच्यावर घटस्फोटासाठी खटला दाखल करू शकते.
4 प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क :
पत्नीला तिचे जीवन सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. तिचा पती किंवा सासू-सासरे आणि घरातील इतरांच्या जीवनशैलीप्रमाणेच तिची जीवनशैली असावी. त्याचबरोबर घरात तिचा मानसिक किंवा शारिरिक छळ होता कामा नये.
5 घरखर्चासाठी पतीकडून रक्कम मिळण्याचा हक्क :
पतीच्या राहणीमानानुसार राहण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी पत्नीला आवश्यक ती रक्कम पतीने देणे हे त्याचे कर्तव्य आहे. कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी ही रक्कम आवश्यक असते.
6 मुलांचे पालनपोषण :
पती-पत्नीने त्यांच्या अपत्याचे पालनपोषण करायचे असते. याची जबाबदारी दोघांवर असते. जर स्त्री कमावती नसेल तर मुलांच्या पालनपोषणाचा सगळा खर्च पतीने करायचा असतो. काही काळासाठी दोघेही कमावते नसले तर ते पतीच्या आईवडिलांकडून मदत घेऊ शकतात. अल्पवयीन मुलालादेखील आईवडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क असतो.
हेही वाचा : Winter Fashion Tips : हिवाळ्यातही मिळेल स्टेटमेंट लूक या अॅक्सेसरीजने
Edited By – Tanvi Gundaye