Sunday, February 16, 2025
HomeमानिनीHealthWorld Cancer Day 2025 : डीएनएच्या माध्यमातून कॅन्सर वर करू शकता...

World Cancer Day 2025 : डीएनएच्या माध्यमातून कॅन्सर वर करू शकता मात

Subscribe

डॉ. उमा डांगी, फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथील कन्सल्टन्ट-मेडिकल ऑन्कोलॉजी डॉ. उमा डांगी यांचा जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष लेख

डॉ. उमा डांगी, फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथील कन्सल्टन्ट-मेडिकल ऑन्कोलॉजी डॉ. उमा डांगी यांचा लेख

कर्करोग म्हणजे इतर काही नसून अपसामान्य पेशींची अनियंत्रित वाढ असते, जिचा तुमच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. अशी वाढ पेशींच्या वाढीच्या नियमनात आणि/किंवा डीएनएच्या दुरुस्तीत सहभागी असलेल्या जनुकांमध्ये विकसित झालेल्या उत्परिवर्तनाचा (म्युटेशन्स) परिणाम असतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनकालामध्ये निर्माण झालेल्या म्युटेशन्सना स्पोरॅडिक म्युटेशन्स असे म्हणतात व ती फक्त ट्यूमरग्रस्त पेशींमध्येच आढळून येतात. काही म्युटेशन्स पालकांकडून अनुवांशिकतेने आलेली असू शकतात, ज्यामुळे एखाद्याला विशिष्ट कर्करोग होण्याचा धोका वाढतो व अशा कर्करोगांना ‘हेरेडिटरी कॅन्सर्स’ अर्थात अनुवांशिकतेमुळे होणारे कर्करोग असे म्हणतात. ही म्युटेशन्‍स पालकांकडून येणाऱ्या जर्म लाइन पेशींमध्ये अस्तित्त्वात असतात आणि म्हणूनच व्यक्तीच्या सर्व पेशींमध्ये ती आढळून येऊ शकतात.

कर्कपेशींमध्ये असलेल्या जनुकीय अपसामान्यता शोधण्यासाठी अनेक चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्करोगाचे जीवशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली आहेच, पण याचबरोबर यातून म्युटेशन्सना लक्ष्य करणारी नवनवी औषधेही विकसित करण्यात आली आहेत. या म्युटेशन्सना लक्ष्य करण्यावर आधारलेल्या उपचारपद्धतींच्या वापरातून या म्युटेशन्समुळे वाढलेल्या कर्करोगावरील उपचारांना अधिक चांगला प्रतिसाद व परिणाम मिळत असल्याचे दिसून आले आहे व ही उपचारपद्धती प्रीसिशन ऑन्कोलॉजीचा आधार आहे. इतकेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात आधीच्या पिढ्यांमध्ये कर्करोगाची प्रकरणे वांरवार आढळण्याचा इतिहास असल्यास अशा व्यक्तीची जनुकीय तपासणी करून कर्करोग विकसित होण्याचा धोका असलेल्या व्यक्तींना ओळखणे शक्य आहे. या व्यक्तींच्या बाबतीत कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी प्रोफायलॅक्टिक उपाययोजना पुरविल्या जाऊ शकतात आणि/ किंवा कर्करोगाचे निदान लवकरात लवकर व्हावे यासाठी अधिक सक्षम स्क्रिनिंग पद्धती वापरल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, पॉझिटिव्ह BRCA म्युटेशन असलेल्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या प्रोफायलॅक्टिक मास्टेक्टॉमीज किंवा उफोरेक्टोमीज.

अशी म्युटेशन्स शोधणे ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे व त्यासाठी ट्यूमर टिश्यूंमधील डिऑक्सिरिबोन्युक्लेइक अॅसिड (DNA) आणि रिबोन्युक्लेइक अॅसिड (RNA) वेगळे केले जातात, ज्यानंतर अपसामान्यता शोधण्यासाठी जनुकसंच प्रवर्धित करून त्यातील माहिती वाचली जाते. यासाठी एका विशेष तंत्रज्ञानाची व तज्ज्ञत्वाची आवश्यकता असते आणि यासाठीच्या पुरेशा पायाभूत सोयीसुविधा असलेल्या लॅबोरेटरीजमध्येच ही चाचणी केली जाऊ शकते. या चाचण्यांच्या जटिल स्वरूपामुळे त्यांचे निष्कर्ष हाती यायला दोन ते तीन आठवडे लागू शकतात. काही वेळा डीएनएचा दर्जा, विशेषत: टिश्यूज जुने असल्याने वाईट असेल तर या चाचण्या अपयशी ठरू शकतात.

कोणत्याही प्रकारे म्युटेशन दिसून आल्यास अशा रुग्णांना औषधांच्या उपलब्धतेनुसार खास त्यांच्या आजारास लक्ष्य करणारी टार्गेटेड थेरपी दिली जाऊ शकते. तसेच या म्युटेशन्ससाठी तयार केल्या जाणाऱ्या नव्या औषधांच्या अभ्यासासाठी घेतल्या जाणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्ससाठीही या रुग्णांचा विचार होऊ शकतो. अनेकदा कोणतीही म्युटेशन्स सापडत नाहीत व अशा रुग्णांना टार्गेटेड थेरपी देणे शक्य होत नाही.

कर्करोगाच्या प्रकारावर आधारित वैयक्तिकृत उपचार हा प्रिसिशन ऑन्कोलॉजीचा फायदा आहे. इथे, “योग्य रुग्णाला योग्य वेळी योग्य उपचार देणे” हे लक्ष्य आहे. सध्या प्रगत टप्प्यावर पोहोचलेल्या कर्करोगासाठी आणि काही विशिष्ट दुर्मिळ कर्करोगांसारख्या आजारांच्या बाबतीत, जिथे उपचारांचे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात अशा प्रकरणांमध्ये या पद्धतीचा प्रामुख्याने वापर होत आहे. अनेक प्रकारच्या म्युटेशन्सनेच निदान करण्यासाठी चाचणीसाठी घेतलेला उतींचा नमुना म्हणजे बायोप्सी टिश्यू आवश्यक असले तरीही नव्या शोधांमुळे आता याच असंगती (अनॉमलीज) रक्ततपासणीतूनही शोधता येतात व बायोप्सी टाळता येते. मात्र सध्या ही पद्धत फुफ्फुसे, मोठे आतडे आणि स्तनांच्या कर्करोगासारख्या काही मोजक्या कर्करोगांपुरतीच मर्यादित आहे.

प्रिसिशन ऑन्कोलॉजीच्या या क्षेत्रातील संशोधन अद्यापही सुरू आहे आणि या क्षेत्रात नव्या औषधांची मोठी लाट आली आहे. मात्र, टार्गेटेड औषधांच्या सहाय्याने केलेल्या उपचारांमुळे ट्यूमरमध्ये आणखी नवी म्युटेशन्‍स तयार होऊ शकतात, ज्यामुळे औषधांना प्रतिरोध होऊन ती निष्प्रभ होऊ शकतात. आणि आजार पुढील टप्प्यावर पोहोचल्यास वारंवार बायोप्सी आणि चाचण्या करून घेणे आवश्यक ठरू शकते. कर्करोगावरील उपचारांच्या भविष्यामध्ये क्रांती घडवून आणण्याचे थोर आश्वासन या उपचारांमध्ये आहे, ज्यातून आजाराला नेमकेपणाने लक्ष्य करणाऱ्या आणि प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध होऊ शकतात. या क्षेत्रातील प्रगतीमुळे रुग्ण बचावण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते आणि रुग्णांच्या जीवनमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होऊ शकते.

हेही वाचा : Kiwi Face Mask : किवी फेसमास्कने मिळवा पार्लरसारखा ग्लो


Edited By – Tanvi Gundaye

Manini