Friday, February 7, 2025
HomeमानिनीHealthWorld Cancer Day 2025 : यासाठी साजरा होतो कर्करोग दिन

World Cancer Day 2025 : यासाठी साजरा होतो कर्करोग दिन

Subscribe

दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे, त्याबद्दलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि या आजाराशी लढण्यासाठी उपाययोजना आखणे हे या दिवसाचे काही मुख्य उद्देश आहेत. कर्करोग हे आज जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि कर्करोगाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. जागतिक कर्करोग दिनाचे उद्दिष्ट केवळ लोकांना या आजाराविषयी जागरुक करणे हा नाही तर या आजारावरील उपचार आणि प्रतिबंध यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा आहे. या दिनाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास :

जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी 2000 रोजी सुरू झाला. याची स्थापना युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) द्वारे करण्यात आली, जी कॅन्सर विरुद्धच्या लढाईतील आघाडीची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. UICC ने जगभरात कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि या आजाराशी लढण्याकरता जागतिक एकता दाखवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

कॅन्सरबद्दलचे गैरसमज दूर करणे, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सरकार, संस्था व नागरिकांना या आजाराविरुद्ध कारवाई करण्यास प्रवृत्त करणे हा या दिनाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो आणि या दिवशी कर्करोगाशी संबंधित विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते.

जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व

कर्करोग हा एक असा आजार आहे ज्याने जगभरातील लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, कर्करोग हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि दरवर्षी लाखो लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून जीवनशैलीतील बदल, प्रदूषण, तंबाखू आणि दारूचे सेवन, असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव ही कारणे याला जबाबदार आहेत.या दिवसाच्या माध्यमातून लोकांना कर्करोगाची लक्षणे, निदान, उपचार आणि प्रतिबंध याबाबत माहिती दिली जाते.

World Cancer Day 2025 Cancer Day is celebrated for this

जागतिक कर्करोग दिन 2025 ची थीम

दरवर्षी जागतिक कर्करोग दिन एका खास थीमसह साजरा केला जातो. 2025 मधील जागतिक कर्करोग दिनाची थीम “युनायटेड बाय युनिक” आहे. या थीमचा उद्देश लोकांना हे समजावून सांगणे आहे की केवळ उपचाराने कर्करोग जिंकता येत नाही, तर ही एक लढाई आहे जी लोकांना सोबत घेऊन लढली पाहिजे आणि मुळापासून उखडून टाकली पाहिजे. कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात प्रत्येक व्यक्ती योगदान देऊ शकते या विचारावर ही थीम भर देते.

कर्करोगाबाबत जनजागृतीची गरज

कर्करोग हा एक आजार आहे जो त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत आढळल्यास बरा होतो. परंतु, बहुतेक प्रकरणांमध्ये, लोकांना कर्करोगाच्या लक्षणांबद्दल माहिती नसते, ज्यामुळे रोग
पुढील अवस्थेत पोहोचतो. आणि उपचार करणे कठीण होते. त्यामुळे कर्करोगाबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे.
जागतिक कर्करोग दिनाच्या माध्यमातून, लोकांना कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जागरुक केले जाते, जसे की अचानक वजन कमी होणे, दीर्घकाळ खोकला किंवा घसा खवखवणे, शरीरात गुठळ्या तयार होणे, थकवा येणे आणि त्वचेत बदल होणे.

कर्करोग प्रतिबंधक उपाय

कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून या आजाराचा धोका कमी करता येतो.

तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन करू नका:
तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन हे कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. यापासून दूर राहिल्यास कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.

सकस आहार घ्या:
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी युक्त आहार घ्यावा. प्रक्रिया केलेले आणि लाल मांसाचे सेवन टाळावे.

नियमित व्यायाम:
शारीरिक हालचालींचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला पाहिजे. नियमित व्यायामामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

नियमित चाचण्या:
नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे, विशेषत: जर कुटुंबात आधी कोणाला कर्करोग झाला असेल तर जास्त खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

सूर्यकिरणांपासून संरक्षण:
त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी, उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.

हेही वाचा : World Cancer Day 2025 : कर्करोग होऊ नये म्हणून काय कराल? केवळ धूम्रपान नव्हे तर याही गोष्टी टाळा


Edited By – Tanvi Gundaye

Manini