कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, जो जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. दरवर्षी या आजाराचे अनेक जण बळी बनतात. असं जरी असलं तरी आजही या आजाराबाबत लोकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. अनेकदा हा आजार जेव्हा होतो तेव्हा याची अनेक लक्षणे दिसू लागतात, पण लोक यांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत, जागतिक कर्करोग दिन हा दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी लोकांना या आजाराबद्दल आणि त्याच्या गांभीर्याबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने साजरा केला जात आहे. या दिवसाचा उद्देश लोकांना या आजाराची योग्य माहिती देणे हा आहे, जेणेकरून त्याचे गंभीर परिणाम टाळता येतील. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत परंतु धूम्रपानामुळे होणारा फुप्फुसाचा कर्करोग हा अधिक प्रमाणात आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. या कॅन्सर दिनानिमित्त अधिक जाणून घेऊयात फुप्फुसाच्या कर्करोगाविषयी.
फुफ्फुसाचा कर्करोग :

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे जगभरात एक आव्हान आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे धूम्रपान हे प्रमुख कारण आहे. परंतु धुम्रपान न करणाऱ्यांना प्रदूषण आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील कर्करोगाचा धोका असतो. अशा परिस्थितीत, धूम्रपान सोडण्याव्यतिरिक्त, त्याचा धोका इतर काही मार्गांनी देखील कमी केला जाऊ शकतो
रेडॉनचा संपर्क कमी करा :

रेडॉन हा नैसर्गिकरित्या उद्भवणारा किरणोत्सर्गी वायू आहे जो घरांमध्ये जमा होऊ शकतो. विशेषतः जमिनीत युरेनियमचे प्रमाण जास्त असलेल्या भागात. हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दुसरे प्रमुख कारण आहे. म्हणून, तुमच्या घराभोवती असलेल्या रेडॉन वायूच्या पातळीची तपासणी करून घ्या आणि कर्करोगाची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा प्रयत्न करा. जसे की वेंटिलेशन सुधारणे किंवा रेडॉन कमी करणाऱ्या सिस्टिमला फॉलो करणे इत्यादी.
वायू प्रदूषण टाळा :

कारमधून होणारे वायूचे उत्सर्जन आणि फॅक्टरी रसायने यासारख्या वायू प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, जास्त रहदारी असलेल्या भागांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, जर आसपासचे वातावरण खराब झाले असेल, हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला असेल तर अशा दिवशी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळा आणि तुमच्या घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचला. किंवा बाहेर जायचंच असेल तर योग्य ती काळजी घ्या जसे की मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे.
धूम्रपान टाळा :

धूम्रपान केवळ आरोग्यासाठीच हानिकारक नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही हानी पोहोचवते. धूम्रपान करून, तुम्ही केवळ स्वतःलाच धोक्यात आणत नाही, तर तुमच्यामुळे लोकांचा निष्क्रिय धूम्रपानाचा बळी होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून, शक्य तितक्या लवकर धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आजूबाजूला धुम्रपानमुक्त वातावरण तयार करा. जेणेकरून तुमच्यामुळे इतरांना त्याचा त्रास होणार नाही.
सकस आहार आणि व्यायाम :

अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबरने समृद्ध आहार कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ब्रोकोलीसारख्या भाज्या या आजारापासून अतिरिक्त संरक्षण देऊ शकतात. तसेच, नियमित व्यायामामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगासह अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
नियमित तपासणी :

कर्करोगाचा उच्च धोका असलेल्या लोकांनी त्यांची नियमित तपासणी करून घ्यावी. ज्यांना अधिक धोका आहे अशा लोकांसाठी, जसे की ज्यांच्या घरात कोणाला तरी कॅन्सर आहे किंवा जे विषारी वायूच्या संपर्कात आहेत अशा लोकांसाठी, नियमित तपासणी अत्यंत महत्वाची आहे, ज्यामुळे रोगाची लक्षणे शोधण्यात मदत होते आणि वेळेत योग्य उपचार घेऊन बरे होण्याची शक्यता अधिक वाढते.
हेही वाचा : Fashion Tips : एथनिक वेअरसाठी ज्वेलरी निवडण्याच्या सोप्या टिप्स
Edited By – Tanvi Gundaye