जागतिक अन्न सुरक्षा दिन २०२२: लहान मुलांसाठी ‘हे’ पाच पदार्थ आहेत फायदेशीर, शरीराला मिळेल उत्तम चालना

तुमच्या मुलांसाठी अधिक फायदेशीर...

जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day 2022) दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस २०१९ पासून साजरा केला जात आहे. अन्नामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यामागचा एक उद्देश आहे. विशेषत: पोषणाअभावी मुलांना अनेक आजार होतात. या समस्यांमागील एक कारण म्हणजे अन्नामध्ये फायबरची कमतरता (Fiber Rich Foods). फायबरयुक्त पदार्थ मुलांच्या पचनासाठी आणि त्यांच्या शरीराला चालना देण्यासाठी उत्तम असतात. आम्ही तुम्हाला पाच उत्तम पदार्थ सांगणार आहोत. जे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी अधिक फायदेशीर ठरतील.

हे आहेत पाच पदार्थ :

सफरचंद –

सफरचंद हे फळ आपल्या आरोग्याला अधिक उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. ज्येष्ठ आणि गर्भवती महिलांना आवर्जुन सफरचंद खाण्यास सांगितले जाते. परंतु अनेकांना सफरचंद साल काढून खायची सवय असते. मात्र, सालीसकट सफरचंद खाल्ल्यास शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते. लहान मुलं सफरचंद (Apple) बऱ्याचदा चवीनुसार आणि आवडीने खातात. सफरचंदमध्ये ४.४ ग्रॅमपर्यंत फायबर असते.

गाजर –

पौष्टिकतेनुसार पाहिलं असता गाजर ही मूळ भाजी आहे, जी खायला अतिशय चवदार आणि कुरकुरीत असते. व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीनने समृद्ध असणारं गाजर हे आहारासाठी एक चांगली भाजी आहे. कच्चे गाजर अनेक लोकांकडून खाल्ले जातात. तसेच त्याचा ज्युस सुद्दा प्यायला जातो. गाजर हे उत्तम फळ आणि भाजी असून यामध्ये ३.६ ग्रॅम इतके फायबर असते, जे लहान मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

बीट –

लाल बीट फक्त आरोग्यासाठीच नाही तर अनेक प्रकारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामध्ये फोलेट, लोह, तांबे, मॅंगनीज आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. तसेच एक कप कच्च्या बीटरूटमध्ये ३.८ ग्रॅमपर्यंत फायबर असते. दररोज दोन कप बीटचा रस पिल्यामुळे व्यायामासाठीचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह वाढून व्यायामाचा योग्य फायदा होण्यास मदत होते. बीट खाण्यामुळे कॅल्शिअमची कमतरता दूर होऊन आपली हाडे, दात आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

मसूर –

डाळींमध्ये फायबर तसेच प्रथिने भरपूर असतात. विशेषतः कडधान्यांचा समावेश मुलांच्या आहारात करता येतो. तुम्ही त्यांना वटाणा डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ देऊ शकता. डाळीचे सेवन केल्यास त्याचे अनेक औषधी गुण मिळू शकतात.या डाळमुळे मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग आणि हृदयरोग इत्यादींचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

केळी –

केळीमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे देखील आढळतात. फायबर व्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 आणि पोटॅशियम देखील असते. केळीचे सँडविच किंवा साधे केळंही मुलांना नाश्तामध्ये देता येते. मध्यम आकाराच्या केळीमध्ये ३.१ ग्रॅम इतके फायबर असते.


हेही वाचा : कृषीप्रधान भारतात अन्नपदार्थांची नासाडी, संपूर्ण जगामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर