Monday, December 30, 2024
HomeमानिनीFashionSaree Tradition : संस्कृती आणि परंपरा जपणारी भारतीय साडी

Saree Tradition : संस्कृती आणि परंपरा जपणारी भारतीय साडी

Subscribe

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ किंवा ‘नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची’ किंवा ‘रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढिला, हात नका लावू माझ्या साडीला…’ किंवा हल्लीच आलेलं ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’ अशी कितीतरी गाणी आहेत जी महिलांचं साडीप्रेम दाखवतात. लहान असताना आईच्या दुपट्ट्यापासून नेसलेल्या साडीपासून ते पुढे आजीच्या कपाट्यातल्या नऊवारी लुगडी किंवा पैठणी, शालू आणि रेडीमेड साड्यांपर्यंत अनेक साड्या या महिलांसाठी जीव की प्राण असतात.

खरं तर, भारतीय स्त्रिया साडीत जितक्या सुंदर साडीत दिसतात जितक्या इतर कोणत्याही कपड्यात दिसत नाही. असं म्हटलं जातं. या साडीचे महत्त्व अधिक वाढवण्यासाठी वर्षातून एक दिवस जागतिक साडी दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तो दिवस म्हणजे ‘वर्ल्ड सारी डे’अर्थात जागतिक साडी दिवस. या साडी डे निमित्त साड्यांच्या रंजक गंमतीजंमती जाणून घेऊयात.

- Advertisement -

साड्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, अगणित रंगसंगती आहेत आणि काही रुपयांपासून ते लाखोंच्या किंमती आहेत, असं सगळं गणित असलं तरी साडीसारखं वस्र भारताशिवाय अन्यत्र कुठेही नाही. ही साडी भारतातल्या वेगवेगळ्या संस्कृतींचं आणि त्यामधल्या कलाकुसरींचं दर्शन घडवते. भारतात 150 पेक्षा अधिक प्रकारच्या साड्या आहेत. प्रत्येक राज्याची ओळख देखील त्या त्या राज्यातल्या साडीमुळे होते. जसं महाराष्ट्राची पैठणी, गुजरातची बांधणी, बंगालची जामदानी, मध्य प्रदेशची महेश्वरी वगैरे वगैरे. या व्यतिरिक्त कांजीवरम, कलकत्ता, इरकल, कोईमतूरी, पटोला, खादी, गडवाल, इंदूरी, आॅरगंडी, आंरगेंझा, इक्कत, ओरीसी, कश्मिरी असे अनेक मनमोहक प्रकार साडीमध्ये आढळतात.

पैठणी साडी :

पैठणी साडी – Paithani Saree (Image Source : Social Media)

या सर्व प्रकारांपैकी महाराष्ट्रातील स्त्रियांचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे पैठणी साडी. साड्यांची महाराणी पैठणीशिवाय महाराष्ट्रातील लग्नसोहळा अपूर्णच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हल्ली पैठणीमध्ये लोटस पैठणी, डॉलर पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी हे प्रकारही मिळत आहेत.

- Advertisement -

शालू :

शालू साडी – Shalu Saree (Image Source : Social Media)

त्याचप्रमाणे महाराष्ट्रीय लग्नासाठी अनेक नववधूंची पहिली पसंती असते ती शालूला. अतिशय हेवी वर्क हे या साडीचं वैशिष्ट्य. 4- 5 हजारांमध्येही चांगल्या प्रकारचा शालू तुम्हाला मिळू शकतो.

बांधणी साडी :

बांधणी साडी – Bandhej Saree (Image Source : Social Media)

गुजरातमधील प्रसिद्ध साडी म्हणजे बांधणी साडी किंवा बंधेज साडी. बांधणी साडी हे नाव ‘बंधन’ या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ बांधणी आहे. बांधणी साड्या पारंपारिक टाय आणि डाई टेक्निक वापरून बनवल्या जातात, जिथे साडीला गाठी बांधल्या जातात आणि नंतर साडी रंगवली जाते. गाठी रंग पसरण्यापासून रोखतात. या साड्या सुंदर ठिपके असलेल्या प्रिंट्सने बनवल्या जातात. बांधणी साड्यांची किंमत त्यांच्या डिझाइनवर अवलंबून असते.

बलोचोरी साडी :

बलोचोरी साडी – Baluchari Saree (Image Source : Social Media)

बलोचोरी साडी किंवा बलुचारी साडी प्रामुख्याने भारत आणि बांगलादेशातील स्त्रिया परिधान करतात. बालुचारी साड्यांना एक अनोखा देखावा असतो कारण या साड्यांच्या पदरावर पौराणिक दृश्ये दाखवलेली असतात. मुर्शिदाबाद हे असे ठिकाण आहे जिथे प्रामुख्याने बलुचोरी साड्यांचे उत्पादन केले जाते.

मुगा सिल्क :

मुगा सिल्क साडी – Muga Silk Saree (Image Source : Social Media)

मुगा सिल्क ही साडी म्हणजे आसामची ओळख. या साडीचं सिल्क अतिशय टिकाऊ असतं. मुळातच या सिल्कचा रंग पिवळसर- सोनेरी प्रकारातला असतो आणि त्याच्यावर खूप चमक असते.

 कांजीवरम साडी :

कांजीवरम साडी - Kanjivaram Saree (Image Source : Social Media)

त्याचप्रमाणे कांजीवरम साडी ही भारतातील तामिळनाडूमधील कांचीपुरम भागात बनवलेली एक रेशमी साडी आहे. कांजीवरम साड्या त्यांच्या उत्कृष्ट पोत, गुणवत्ता आणि कारागिरीसाठी ओळखल्या जातात. या साड्या बनवण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो.

बनारसी साडी :

बनारसी साडी – Banarasi Saree (Image Source : Social Media)

आणखी एक महत्त्वपूर्ण साडीचा प्रकार म्हणजे बनारसी साडी. ही भारतीय महिलांसाठी सर्वात मौल्यवान साडी आहे. या साड्यांना भारतातच नाही तर जगभरात प्रचंड मागणी आहे. बनारसी साडी मुख्यतः बनारसमध्ये बनवली जाते. या साड्या त्यांच्या सोने, जरी आणि भरतकामासाठी प्रसिद्ध आहेत.

काहीजणींचं मत असतं की साडी मला आवडते पण साडीत फारच ऑल्ड फॅशन वाटतं , साडी नेसून आपण सेक्सी नाही दिसू शकत. तर असं काही नाही कारण हल्ली रेडी टू विअर साड्याही सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्याशिवाय शिफॉन, सिल्क, वेलवेट असे ट्रेंडी ऑप्शन्सही साडीमध्ये मिळू लागले आहेत. जे मॉर्डन पार्टी लूकसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.

साडी अजिबात ऑल्ड फॅशन नाही. तर ती लाज झाकणारी आणि पूर्ण अंग झाकूनही स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारी आहे म्हणूनच की काय ती सर्व महिलांसाठी अगदी जिव्हाळ्याची वाटते.

हेही वाचा : Ready to wear saree fashion : तरुणींना भुरळ घालतोय रेडी टू विअर साड्यांचा ट्रेंड


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini