घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटखरीखुरी सेलिब्रिटी...

खरीखुरी सेलिब्रिटी…

Subscribe

लोकशाहीच्या मोठ्या उत्सवाची पहिली फेरी संपली…आणि कडाक्याच्या उन्हातही लोक मतदानासाठी आले आणि त्यांनी लोकशाहीतला आपला पवित्र हक्क बजावला म्हणून उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले.

…लोक इतक्या उन्हाच्या झळा सोसत मतदान केंद्रांपर्यंत आले…आणि महिला डोईवर पदर घेत तर पुरूष उपरण्यांनी डोकी झाकत मतदान केंद्रांसमोरच्या रांगेत उभे राहिले ह्याचे मीडियावाल्यांनीही कौतुकाने टपाटप फोटो काढले…

- Advertisement -

एकशे एक वर्षांची म्हातारी मतदान केंद्रात आली ह्याचं तर कोण कौतुक झालं!…लोकशाहीत ईव्हीएम अवतरूनसुध्दा मतदान केंद्रातल्या अधिकार्‍यांकडे त्या म्हातारीने मतपत्रिकेवर मारायला शिक्का कुठे आहे असं विचारलं म्हणून अख्ख्या मतदान केंद्राला हसू आलं…

…आता शिक्क्याचा जमाना गेला हे म्हातारीला समजवता समजवता मतदान केंद्रातले अधिकारी बेजार झाले…पण म्हातारी आपला शिक्क्याचा हट्ट आधी सोडायलाच तयार झाली नाही…

- Advertisement -

…मतदानासाठी तुमच्या ह्या मशीनबिशीनवर आपला विश्वास न्हाई, आमचा त्यो कागुद हुता त्योच बरा हुता, असं जेव्हा म्हातारी खणखणीतपणे म्हणाली तेव्हा मतदान केंद्रावरच्या लोकांचे डोळे चमकले…म्हातारी साधीसुधी नाही, ती ह्या वयातसुध्दा आजच्या लोकशाहीचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असणार, असा मतदान केंद्रातल्या सगळ्यांना संशय आला…

…शेवटी ईव्हीएमकडे म्हातारीला नेल्यावर आणि मतदानाची प्रक्रिया समजून सांगितल्यावर म्हातारीने बटन दाबलं…पण मतदान केल्यावर मशीनचा आवाज झाला तसं म्हातारी बावरली…

…ही घंटा कसली वाजली, असा म्हातारीने प्रश्न केला तेव्हा हा आवाज आला म्हणजे तुमची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असं मतदान अधिकार्‍यांनी म्हातारीला सांगितलं…पण म्हातारी इतकी बेरकी की लगोलग म्हणाली, म्हंजे आम्हा मतदाराची भक्ती कुनाच्या तरी पायाशी पोचली, आता देव पाच वर्सं न्हाई आला तरी चालंल…

…मतदान केंद्रातले सगळे लोक म्हातारीच्या त्या इब्लिस डायलॉगवर ऐन उन्हाळ्यात धो धो हसले…पण हसता हसताही म्हातारीने व्यवस्थेला अलगद मारलेली टपली चलाख पब्लिकच्या व्यवस्थित लक्षात आली…

…आता म्हातारीने काठी टेकत टेकत मतदान केंद्राबाहेरची वाट पकडली तसे कुणाचे तरी एकदोन कायकर्ते म्हातारीला हात द्यायला पुढे आले…म्हातारी लागलीच त्याच्यावर फिसकटली आणि म्हणाली, म्या कुनाची मदत न घिताच शंभर वर्षं काढली, आता मत द्याया आलीय म्हणून मला मदत कराया आलास व्हय?…

…म्हातारीने त्या मदतकर्त्याचा हात झिडकारला…आणि, आता तरी मला माज्या घरी जाऊ दे, जाऊ दे न्हवं, असं मोडक्या तालात आणि तोडक्या सुरांत म्हटलं…

…म्हातारी पक्की पोहोचलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं…पण अख्ख्या मीडियासमोर म्हातारीच त्या दिवशीची सेलिब्रिटी ठरली…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -