चाणक्य क्लासेस!

Subscribe

ते म्हणाले, हमारे पास चाणक्य आहे…जमलेल्या सगळ्यांनी टपाटप टाळ्या वाजवल्या.

…चाणक्य म्हणजे डोकेबाजांच्या अंतिम फेरीतला अ गट अंतिम विजेता…त्याचं डोकं चाललं की प्रतिस्पर्ध्याच्या खातमा होणार हे युगानुयुगे लोकांच्या डोक्यात फिट बसलेलं…

- Advertisement -

…तर असा हा चाणक्य हमारे पास है असं ते सांगताहेत म्हटल्यावर विरूध्द पार्टी एकदम गपगार झाली…त्यांनीही मग चाणक्याची पुस्तकं वाचायला सुरूवात केली…

…ते चाणक्याच्या चालींचा अभ्यास करायला बसले…त्यांनीही चाणक्य शिकण्यासाठी शिकवण्या लावल्या…

- Advertisement -

…चाणक्य शिकवणार्‍या चाणाक्ष लोकांनी ह्या प्रक्रियेत त्यांना चालूगिरी करायचा गुरूमंत्र दिला…तोंडावर सज्जन बुरखा पांघरून चापलुसी कशी करायची ह्याचे फंडे शिकवले…

…सोशल मीडियावर महान महान लोकांबाबत खरंखोटं पसरवून त्यांचं हळुहळू लहानीकरण कसं करावं ह्याची दिक्षा दिली…ह्याच्या धडावर त्याचं मुंडकं चढवलेल्या इमेजेस, व्हिडिओज पाठवण्याची कला शिकवली…

…देठोक खोटा इतिहास कळवण्याचं कौशल्य आत्मसात करायला लावलं…प्रतिस्पर्ध्याच्या तोंडून निघालेल्या वाक्याची तोडफोड करून लिहिणार्‍या-वाचणार्‍या माणसांची दिशाभूल कशी करावी ह्याचं तंत्र घोटवून घेतलं…

…अशा पद्धतीने सगळ्यांना भाडेपध्दतीने पार्ट-टाइम, फुल-टाइम चाणक्य मिळू लागले…ह्या चाणक्यांमुळे देशात कसलंही परिवर्तन झालं नसलं तरी देशाच्या राजकारणात अचानक आमुलाग्र परिवर्तन झालं…

…ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा ऐन निवडणुकीत उमेदवारांच्या पळवापळवीचं एक युगप्रवर्तक पर्व आलं…त्याची पुढची पायरी म्हणून ऐन निवडणुकीत दुसर्‍या पक्षांचे प्रवक्ते लंपास करण्याची नवीन प्रथा नव्या राजकारणात आणली गेली…

…राजकारणाच्या बिळाबिळात चाणक्यांचा नुसता सुळसुळाट झाला…नेत्यांनी पक्ष बदलावा तसं चाणक्यांनीही सौदे फसलेली बिळं बदलायची नवी मोहीम हाती घेतली…

…काही पक्षातल्या इनबिल्ट चाणक्यांची मात्र चांदी झाली…त्या काळातल्या त्या चाणक्यांपेक्षाही ह्या काळातल्या ह्या चाणक्यांचा भाव भलताच वधारला…

…प्रत्येक वाक्याला, प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अक्षराला चाणक्यनीतीचा वास येऊ लागला…आणि हळुहळू चाणक्यनीतीलाच सगळे नीती मानू लागले…

…आता तर ते जे कुणी आधी म्हणाले होते की हमारे पास चाणक्य आहे ते आता तसं म्हणायचे बंद झाले…चाणक्याची विद्या चाणक्यालाच रिटर्न गिफ्ट म्हणून मिळू लागली…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -