घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटमुलाखतीतूून मास्टरस्ट्रोक?!

मुलाखतीतूून मास्टरस्ट्रोक?!

Subscribe

लोकांमधला द्वेष कधी जागा होईल काही सांगता येत नाही…आता हेच बघा ना, काल अक्षयकुमारने फार खिलाडूपणे मोदींची मुलाखत घेतली. लागलीच सगळ्यांच्या पोटात दुखू लागलं.

…कुणीतरी कुणाशी तरी दोन घटका बोललं ह्यात खरंतर जळण्यासारखं काय आहे!…पण तरीही काही लोक करपले…

- Advertisement -

…कुणाकुणाला अक्षयकुमार हा अतिशय प्रज्ञावंत कलाकार वाटू शकतो…कुणाला तो साक्षेपी पत्रकार, मुलाखतकार वाटू शकतो, कुणाला तो आजच्या मुलाखतींच्या अल्ट्रामॉडर्न जगातला अल्ट्रामॉडर्न सुधीर गाडगीळही वाटू शकतो…

…तर अशा ह्या बॉलीवूडगावकर झकपक सुधीर गाडगीळांनी नेहमी नाविन्यपूर्ण क्लृप्त्यांची ओढ असणार्‍या मोदींची मुलाखत घेतली तर बिघडलं कुठे?…पण तरीही काही बुरसटलेल्या पुराणपंथी विचारांच्या लोकांच्या पोटात मळमळ सुरू झाली…

- Advertisement -

…लोकोत्तर माणसं लोकोत्तर कशी झाली, ह्याचं उत्तर आम्हाला कधीतरी मिळायला हवं की नको?…हे उत्तर निवडणुकीच्या बरोबर तोंडावरच नेम साधून आम्हाला मिळत असेल तर त्यात आमचा काय दोष?…

…आता ह्या चकचकीत मुलाखतीत अक्षयकुमार नावाचा नटखट नट, वायदा केल्याप्रमाणे तुम्ही अजून लोकांना पंधरा लाख रूपये का दिले नाहीत, असा रखरखीत प्रश्न कसा काय विचारणार!…जो माणूस सर्वसंगपरित्याग करून आपल्या आलम भरतभूमीचं सोनं करायला निघाला आहे त्यांच्यापुढे इतका कचकड्याचा विचार ठेवणं बरं दिसतं का?…

…तुम्हाला विष्णूचा सतरावा अवतार कुणीतरी म्हणालं ह्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, असे सर्वसामान्यांच्या मनातले भाबडे प्रश्न विचारणंही अशा वेळी वास्तविक सर्वतोपरी गैरलागू आहे…अध्यात्म को अध्यात्मही रहने दो, कोई नाम ना दो हे आपण अशा वेळी समजून घ्यायचं असतं…

…अक्षयकुमार हे गृहस्थ त्यांच्या अक्षयकुमार पध्दतीचे सुकुमार प्रश्न विचारणार हेसुध्दा आपण गृहित धरायचं असतं…आणि पेरिले ते उगवते ह्या न्यायाने आपल्याला त्या प्रश्नांची पेरलेली, नांगरलेली उत्तरं समोरून मिळणार हेही आपण गोड मानून घ्यायचं असतं…

…काही जळफळणारी माणसं उगाचच म्हणतात की मुलाखतकाराच्या जागी अक्षयकुमारच्या ऐवजी शत्रुघ्न सिन्हा हवे होते म्हणून…पण अशी खामोश मुलाखत आजच्या निवडणुकीच्या काळात विजोड वाटली असती हे त्यांना कुठे ठाऊक?…

…असो, पण अशी, तुझे बरे माझे बरे, आपण सगळे बरे बरे धर्तीची ही मुलाखत असली तरी काही चॅनेलच्या लोकांना ती मोदींचा मास्टरस्ट्रोक वाटला त्यात काहीही वावगं वाटून घेऊ नये…हल्लीच्या निवडणुकीतल्या अशा प्रचारतंत्रात लोकांच्या प्रत्यक्ष जीवनातल्या गंभीर गोष्टींचा संबंध आलाच तर तो योगायोग मानावा!…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -