मुंबई – पालकमंत्रीपदाचा वाद अजून मिटलेला नाही. ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्र्याच्या हस्तक्षेपाने महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांवर आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 11 आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रावीद अजित पवार गट यांच्या आमदारांना स्थान देण्यात आलेले नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मित्रपक्षाच्या आमदारांना योग्य प्रतिनिधीत्व दिले जाईल असे म्हटले आहे. मात्र महायुतीतील प्रमुख दोन घटक पक्षांच्या आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सध्या 11 आमदारांची नावे समोर आली आहे.
1) मोनिका राजळे – महिला हक्क आणि कल्याण समिती
2) नमिती मुंदडा – धर्मदाय खासगी रुग्णालय चौकशी समिती
3) राम कदम – विशेष हक्क समिती
4) अतुल भातखळकर – मराठी भाषा समिती
5) किसन कथोरे – इतर मागासवर्गीय कल्याण समिती
6) नारायण कुचे – अनुसूचित जाती कल्याण समिती
7) राजेश पाडवी – अनुसूचित जमाती कल्याण समिती
8) रवी राणा – आश्वासन समिती
9) संतोष दानवे – पंचायत राज समिती
10) राहुल कुल – सार्वजनिक उपक्रम समिती
11) सचिन कल्याणशेट्टी – आमदार निवास व्यवस्था समितीत
महायुतीमध्ये सरकार स्थापनेपासून विविध वाद समोर येत आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्री पद, त्यानंतर मंत्रिमंडळाता कोणाची निवड, त्यानंतर खातेवाटप आणि पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही शमलेला नाही. त्याततच आता ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, त्यांची विविध समित्यांवर वर्णी लावली जात आहे. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जात असल्याची चर्चा आहे. यात भाजपने बाजी मारली आहे त्यांच्या 11 आमदारांची विविध महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र महायुतीतील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा यात समावेश झालेला नाही.
भाजप प्रदेशाध्यभक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आमदारांच्या नियुक्तीवर म्हटले आहे की, विधिमंडळ समित्यांवर मित्रपक्षांच्या आमदारांनाही प्रतिनिधीत्व दिले जाईल. मात्र अद्याप ते वेटिंगवर असल्याचेच समोर आले आहे.